मालवण येथे १९ व २० ऑगस्ट रोजी झिम्माड महोत्सव

मालवण येथे १९ व २० ऑगस्ट रोजी झिम्माड महोत्सव

*कोकण Express*

*मालवण येथे १९ व २० ऑगस्ट रोजी झिम्माड महोत्सव*

*कवी महेश केळुसकर अध्यक्ष तर राजन गवस यांच्या हस्ते उद्घाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कायद्याने वागा लोकचळवळीचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था व झिम्माड काव्यसमूह यांच्या वतीने ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘झिम्माड महोत्सव २०२३ मराठी कवितेचं गणगोत या दोन दिवसीय कला साहित्यिक उपक्रमाचे आयोजन १९ व २० ऑगस्ट रोजी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण या समाजप्रेरणा भूमीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठीतील नामवंत लेखक राजन गवस यांच्या हस्ते होणार आहे. कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम है। या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष असतील.

अशी माहिती स्वागताध्यक्ष किशोर कदम, स्थानिक संयोजन समिती सदस्य सरिता पवार, राजेश कदम, सिद्धार्थ तांबे, कल्पना मलये यांनी दिली.

कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट केली. मराठी भाषा अभ्यासक वृषाली विनायक यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या झिम्माड महोत्सवाच्या आयोजन समितीत अरुण गवळी, जितेंद्र लाड, संध्या लगड, सुधीर चित्ते, शालिनी आचार्य यांचा समावेश आहे. कवयित्री सरिता पवार झिम्माड महोत्सव – २०२३ च्या स्थानिक समन्वयक असून राजेश कदम, सिध्दार्थ तांबे, कल्पना मलये याचा स्थानिक संयोजन समितीत सहभाग आहे..

झिम्माड काव्यसमुहाने समाजमाध्यमांच्या आधारे महाविद्यालयीन काव्यस्पर्धा, अभिवाचन, ऑनलाईन कविसंमेलन, ऋतुरंग बोलू कवतिके,

अभिव्यक्ती चर्चा यासारखे विविध उपक्रम राबवून साहित्य वर्तुळात आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. झिम्माड महोत्सव दरवर्षी पावसाळ्यात आयोजित केला जातो. साहित्यिक सहल, महाराष्ट्रातील कलासाहित्य क्षेत्रातील मंडळींचा परिचय, समन्वय, चर्चा, परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन, संगीत असं उपक्रमाचं स्वरूप आहे. पुण्यातील एस. एम. जोशी फाऊंडेशनमध्ये पहिल्यांदा झिम्माडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर दापोलीतील वराडकर बेलोसे महाविद्यालय, माणगांव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, कसाच्यातील रिलॅक्स रिसॉर्ट अशा विविध ठिकाणी झिम्माड महोत्सव साकार झालाय.

महोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. महोत्सवात महाराष्ट्रातील कला, चित्र, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात परिसंवाद, मुलाखत, मुक्तसंवाद, चित्रसवाद व कविसंमेलन यांचा अंतर्भाव आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. नरसिंग इंगळे आणि डॉ. राजेंद्र राठोड यांच्याशी

स्टेथेस्कोप या सत्रात संवाद साधला जाणार आहे तसंच उपस्थित सदस्यांचा सहभाग असणारा ऐसपैस हा लता गुठे यांच्या अध्यक्षतेखालील मुक्तसंवादसुध्दा अनुभवता येणार आहे. २० ऑगस्टच्या उद्घाटन सत्रात समीक्षक केशव तुपे, लेखिका रश्मी कशेळकर, कवी / गीतकार विनायक पवार आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय, चित्रकार केशव कासार आणि चित्रकार नामानंद मोडक यांची मुलाखत ऐकायला मिळणार आहे. अभिव्यक्तीची ऐशीतैशी या परिसंवादात प्रवीण बांदेकर, कुंदा प्र. नी. सीरत सातपुते, प्रतिभा सराफ, मंगेश सातपुते, राजश्री हिरा मधुकर यांचा सहभाग असणार आहे. राज्यातील मान्यवर कवींचा सहभाग असलेल्या दोन कविसंमेलनांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!