*कोकण Express*
*तळेरे येथे नव्याने फ्लायओव्हर ब्रिज उभारण्याच्या जनमागणीला न्याय मिळण्याची आवश्यकता*
*कासार्डे ; संजय भोसले*
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील तळेरे येथे सद्यस्थितीत उभारण्यात आलेल्या ब्रिजमुळे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत.या ब्रिजच्या भिंत्तयुक्त बंदिस्त भागांमुळे येथील बाजारपेठेचे दोन स्वतंत्र भागात विभाजन होऊन त्याचा फार मोठा विपरीत परिणाम स्थानिक व्यापारी पेठेतील व्यापारावरती झालेला आहे.महामार्गावरील तळेरे एसटी बस स्थानकापासून ते ओढ्यावरील ब्रीज पर्यंतच्या भागात पिलरयुक्त खुल्या भागाचे फ्लायओव्हर ब्रिज नव्याने उभारण्यात यावे अशा प्रकारची मोठी जनमागणी आहे. या जनमागणीचा संबंधित शासन-प्रशासनाने सकारात्मक व गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी केली आहे.
तळेरे या गावात महामार्गाच्या दुतर्फा वसलेली अशी मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. आठवड्याच्या दर मंगळवारी येथे सुमारे १२ तास सुरू असणारा आठवडी बाजार भरतो. विविध प्रकारच्या नागरी सोई-सुविधा येथे सहज उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यामध्ये अधिकाधिक भर पडत आहे. मुंबईच्या दिशेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर सर्वसामान्यत: सर्व प्रकारच्या नागरी सोई-सुविधांनी युक्त असणारे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आहे. कोल्हापूरच्या दिशेकडून गगनबावडा घाट मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे अथवा विजयदुर्गच्या दिशेकडे जाण्यासाठी या गावातून जावे लागते. तसेच मुंबई, गोवा, देवगड, विजयदुर्ग इ. ठिकाणच्या दिशेकडून गगनबावडा घाट मार्गे कोल्हापूर,पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी देखील या गावातून जावे लागते. एकंदरीत तळेरे या गावासह दशक्रोशीतील व बाहेर गावचे नागरिक हे आपल्या विविध कार्य प्रयोजनास्तव येथे सातत्याने ये-जा करीत असतात व त्यामुळे येथे रोजची फार मोठी लोक वर्दळ असते.
ही सर्व परिस्थिती मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामकाजाच्यावेळी अभ्यासपूर्वक अवलोकनात घेऊन त्याअनुषंगाने येथील बाजारपेठेचे कोणत्याही स्वरूपाचे विभाजन होणार नाही, तसेच येथील आठवडी बाजार विस्थापित न होता त्याचे योग्य असे नियोजन होईल, येथे ये-जा करणाऱ्या माल वाहतुकीच्या वाहनांसह प्रवासी वाहतूकीच्या वाहनांना व नागरिकांच्या खाजगी वाहनांना वाहनतळासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, महामार्गालगतचे दोन्ही सर्व्हीस रस्ते पुरेसे रुंदीचे व अवजड वाहतुकीसाठी सक्षम ठरतील, सर्व प्रकारच्या वाहनांना योग्य दिशेने व बाजूने सुरक्षितरीत्या वळता येईल, कोठेही वाहतूकीची कोंडी होणार नाही, कोणताही वाहन अपघात होणार नाही, पादचारी नागरिकांना सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने स्वतंत्र पादचारी मार्गावरून सहज, सुलभ व सुरक्षितरीत्या ये-जा करता येणे शक्य होईल, स्त्री-पुरुष यांच्याकरिता सार्वजनिक प्रसाधनगृहाची सोय उपलब्ध होईल, पावसाळी पाणी कधीही स्थानिक व्यापारी बाजारपेठेत न घुसता अथवा थेट सर्व्हिस रस्त्यांवरून न वाहता त्या लगतच्या बंदिस्त व प्रशस्त अशा गटारांमधून त्याचा सुरळीत निचरा होईल, स्थानिक प्राधिकरणाला सांडपाणी निचरा करण्यासाठी स्वतंत्र गटार व्यवस्था अथवा नळपाणी योजनेकरिता पाईप लाईन व्यवस्था अथवा भूमिगत वीज वाहिनी व्यवस्था इ. स्थानिक नागरी सुविधेच्या प्रकल्प निर्मिती व देखभाल दुरुस्तीकरिता दोन्ही सर्व्हीस रस्त्यांच्या गटारालगत पुरेशी जागा उपलब्ध होईल अशा अनेक बाबतीतले कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.येथील अरुंद सर्व्हिस रस्त्यावरुन होणारी सततची वाहतूक कोंडी व चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारांमुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबत असल्यामुळे व्यावसायिक, ग्रामस्थ, पादचारी आणि वाहनचालकांना विविध नागरी समस्या उद्भवत आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी लक्ष वेधून देखील त्याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
वास्तविकपणे तळेरे हे एक विकसनशील गाव असून प्रस्तावित नवीन तालुक्याचे मुख्यालयीन ठिकाण व्हावे अशी प्रलंबित जनमागणी आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गा प्रमाणेच विजयदुर्ग बंदर ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून प्रस्तावित आहे.तो महामार्ग देखील तळेरे येथूनच जात असून त्याबाबतचे नियोजन लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.या मार्गावरील देखील एक महत्वाचे व्यापारी केंद्र असलेले असे ठिकाण आहे. येथे दळणवळण व व्यापारीदृष्ट्या फ्लायओव्हर ब्रिज उभारण्यात यावे अशी जनमागणी महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी पासूनची होती. तशा प्रकारची विनंती करणारी निवेदने संबंधित शासन-प्रशासनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेली आहे.खरेतर या जनमागणीचा संबंधित शासन विवादांसाठी प्रशासनाने सकारात्मक विचार करणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यत्वे कणकवली आणि तळेरे या दोनच मुख्य बाजारपेठांचा समावेश आहे. मात्र त्यापैकी कणकवली येथे वाय स्वरूपाच्या पिलरवर उभारलेले ओपन फ्लायओव्हर ब्रीज उभारण्यात आलेले आहे, मग असे तळेरे येथे का घडले नाही? येथील व्यापार उध्वस्त होण्याचा धोका व्यापारी वर्गाने व ग्रामस्थांनी वारंवार लक्षात आणून दिल्यानंतर देखील त्याची गंभीर दखल संबंधित शासन-प्रशासनाने न घेतल्याने त्याचा विपरीत परिणाम येथील व्यापारावरती मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
म्हणूनच याबाबत तळेरे येथे नव्याने पिलरवर उभारलेले खुल्या भागाचे फ्लायओव्हर ब्रीज उभारण्याची जनमागणी पुन्हा ऐरणीवर आणून ती मान्य होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना व वाहतूक संघटना यांच्या संपूर्ण सहकार्याने संविधानिक लोकशाही मार्गाने आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे राजेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

