*कोकण Express*
*कणकवली पटवर्धन चौकातच अनधिकृत वीज कनेक्शनचा सुळसुळाट..*
कणकवली पटवर्धन चौक येथे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुकाने थाटलेल्या व्यवसायिकांनी दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून अनधिकृत विद्युत कनेक्शन घेतल्याची बाब समोर आली आहे. कणकवली शहरात खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराने महावितरणच्या व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही मिलीभगत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान अशाप्रकारे अनधिकृतपणे विद्युत पुरवठा घेत दुकानांमध्ये रात्रीच्या वेळी सुरू असलेला झगमगाट एखाद्या दुर्घटनेत किंवा जीवितहानी कारणीभूत ठरल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठेकेदार कंपनीच्या विद्युत कनेक्शन वरून काही व्यवसायिकांनी अन्य व्यवसायिकांना विद्युत कनेक्शन देऊन अनधिकृतपणे बिल आकारणी केल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत महामार्ग प्राधिकरण, वीज वितरण व नगरपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याने दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
