शारीरिक शिक्षण शिक्षक संच मान्यतेत घेण्यास शासन सकारात्मक

शारीरिक शिक्षण शिक्षक संच मान्यतेत घेण्यास शासन सकारात्मक

*कोकण Express*

*शारीरिक शिक्षण शिक्षक संच मान्यतेत घेण्यास शासन सकारात्मक* 

*शिक्षण संचालक महेश पालकर*

*शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ पदाधिकारीसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा*

*कासार्डे  संजय भोसले*

शारीरिक शिक्षक संच मान्यता, नोकर भरती, पवित्र पोर्टल व इतर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकी संदर्भात शिक्षण संचालक कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संचमान्यता निकष दुरुस्तीत शारीरिक शिक्षकांचे पूर्वीप्रमाणे पद निर्धारण करण्याबाबत शारीरिक शिक्षक संघटनेने सुचवलेल्या पर्यायांचा विचार करून शासनास सकारात्मक प्रस्ताव पाठविण्यात येईल असे राज्य शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती व शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर या दोन्ही संघटनेच्या प्रतिनिधीं सोबत झालेल्या बैठकीत शिष्टमंडळास आश्वासित केले. या बैठकीस शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक बेलसरे मॅडम, शिक्षणाधिकारी अरुणराव धामणे, प्रशासन अधिकारी राजेश शिंदे उपस्थित होते.
शारीरिक शिक्षकांचे प्रलंबीत मागण्यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे निर्देशानुसार पुणे मुख्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीत शारीरिक शिक्षक संचमान्यता, बायफोकल पद्धतीने शिक्षक भरती, पवित्र पोर्टल मधील पूर्ण कार्यभाराची अट रद्द करणे, खेळाडू अपघात विमा लागू करणे, निवड श्रेणीसाठी एम.पी.एड. ची अट रद्द करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, शिक्षकांना अतिरीक्त न करणे, बालभारती अभ्यासगट, फिट इंडिया उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व तासिका, आश्वासीत प्रगती योजना, अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रियेत तज्ञ शिक्षक नेमणूक, उच्च माध्यमिक कार्यभार तसेच अन्य विषया बाबत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली. या वेळी संघटना प्रतिनिधींनी विविध शासन निर्णय, न्यायालयीन निर्णय, शासन निर्णयातील तरतुदींबाबत बैठकीत अवगत केल्याची माहिती संघटनेचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड,कोअर कमिटी राज्य सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण,सचिव दिनेश म्हाडगुत यांनी दिली.
या बैठकीस अमरावती शारीरिक शिक्षक महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे, सचिव पुरुषोत्तम उपर्वट, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, क्रीडा विकास परिषदेचे सचिव ज्ञानेश काळे, शिवछात्रपती पुरस्कारार्थी डॉ. नितीन चवाळे, अजय आळशी, विश्वनाथ पाटोळे, संदिप इंगोले, मच्छिंद्र ओव्हाळ, महेश अलोने, फिरोज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!