*कोकण Express*
*देशी गाई पालनातून निश्चित आर्थिक समृद्धी – महेश संसारे*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
देशी गाईच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मानवी जीवनात आर्थिक समृद्धी प्राप्त होऊ शकते. मानवी आरोग्यासाठी गाईची पंचगव्य उत्पादने फार महत्त्वाची आहेत. गाईचा वापर केवळ धार्मिक व दुधासाठी हा गैरसमज शेतकऱ्यांनी काढून टाकावा. प्रत्येक शेतकऱ्याने देशी गाईचे संगोपन करावे व प्रवण फार्मर कंपनीचे भागधारक व्हावे. यातून शेतकरी आर्थिक सदन निश्चित होईल असा विश्वास प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष महेश संसारे यांनी व्यक्त केला.
लुपिन ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गोधन दिवाळी उपक्रमांतर्गत गोमय पणत्या बनविणे प्रशिक्षण शिबीर नाधवडे येथे पार पडले. महिला बचतगट प्रतिनिधींना या प्रशिक्षणात गोमय पणत्या, अग्निहोत्र गोवऱ्या, शोभेच्या विविध वस्तू बनविणे याबाबत प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लूपिन जिल्हा प्रतिनिधी प्रवीण पेडणेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. पी. परब, कंपनीचे उपाध्यक्ष सचिन म्हापुसकर, सचिव प्रशांत कुळ्ये, संचालक साधना नकाशे, सुहास सावंत, राजेश तावडे, मंगेश कदम, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कदम, सेंद्रिय शेतकरी नंदकुमार आम्रसकर, गो पालक संजय शिंदे, व बचत गटाच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संसारे म्हणाले, या दिवाळीत महिला बचत गटामार्फत जिल्ह्यात एक लाख गोमय पणत्या विकण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठरविले आहे.
यातून स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गो आधारित नैसर्गिक शेती, मानवी आरोग्यासाठी पंचगव्य उत्पादनाचा वापर आणि आर्थिक समृद्धी ही तीन महत्त्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कंपनीची वाटचाल सुरू आहे. जे शेतकरी भागधारक होऊन गोपालन करतील त्यांना कंपनीच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणे यापुढेही दिली जातील. उत्पादित मालाला स्थानिक बाजारपेठ व देश-विदेशात ही बाजारपेठ कंपनीमार्फत उपलब्ध करून दिली जाईल. नाबार्डच्या सहकार्यामुळे कंपनी शेतकऱ्यांच्या हिताचे धाडसी निर्णय घेत आहे असे सांगितले. जिल्ह्यातील इच्छुक गो पालकांनी कंपनीचे शेअर खरेदी करून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन अध्यक्ष महेश संसारे यांनी केले आहे.