*कोकण Express*
*तळेरेत नरकासुराची मिरवणूक काढून केले दहन*
*कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला*
*कासार्डे ः संजय भोसले*
या वर्षीच्या दिवाळी सणावर कोरोना आणि लॉकडाउनचा प्रभाव नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही बाजारपेठांबरोबरच घरोघरी दिवाळीच्या सणामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी म्हटली लाडू करंज्यांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य असतं हे म्हणजेच नरकासुर बनविणे आणि दिवाळीच्या भल्या पहाटे त्याचे दहन करणे. यामध्ये तरुण आणि लहान मुलांचा सहभाग खूप मोठा असतो. अनेक शहरांमध्ये नरकासूर स्पर्धाही आयोजित केल्या जातात.
तळेरे सारख्या ग्रामीण भागातही या वर्षी मुले एकापेक्षा एक सरस नरकासुर बनवण्यात व्यस्त होती. आपला नरकासुर अधिक मोठा आणि आकर्षक कसा बनेल, यासाठी सर्वजण झटून कामाला लागले होते. विशेषकरून तळेरे येथील पेंटर भाई महाडिक व अजय ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुले एकत्र झाली आणि त्यांनी आकर्षक असा नरकासुर बनविला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या नरकासुराच्या प्रतिकृतीची तळेरे नामदेव आळी ते बाजारपेठ मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून तळेरे बसस्थानक व तेथून पुढे मच्छीमार्केट पर्यंत डीजेच्या तालावर मंडळ कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली व शेवटी याच परिसरातील मोकळ्या जागेत त्याचे दहन केले.
याप्रसंगी तळेरे बाजारपेठ मंडळाचे अध्यक्ष उल्हास कल्याणकर, विनायक कल्याणकर, अप्पा कल्याणकर, योगेश राणे, भाई महाडिक, प्रवीण वरूनकर, किशोर वरूनकर, संजय वरूनकर, बंड्या महाडिक, सागर डंबे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते व बच्चेकंपनी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. तळेरे येथील नरकासूर दहणाची परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे, अशी माहिती तळेरे येथील ज्येष्ठ नागरिक अरविंद उर्फ भाई मुद्राळे यांनी दिली.

