*कोकण Express*
- *विद्यार्थ्यांजवळ फीसाठी तगादा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची चौकशी करण्यात यावी….*
*सावंतवाडी मनसेच्यावतीने गट शिक्षणाअधिकारी कल्पना बोडके यांच्याकडे मागणी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील काही खाजगी शाळांकडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून फीसाठी तगादा लावण्यात येत आहे. मात्र कोरोना काळात फी भरणे पालकांना शक्य नसल्याने विद्यार्थ्यांजवळ फीसाठी तगादा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी मनसेच्यावतीने सावंतवाडी पंचायत समिती गट शिक्षणाअधिकारी कल्पना बोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव विठ्ठल गावडे, मनविसे तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर, शुभम सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, कोरोना काळात गेले सात ते आठ महिने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. नोकरी धंदे बंद असल्यामुळे लोकांचे रोजगार देखील बुडाले आहेत. तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी देखील मेटाकुटीस आलेला आहे. अशा परिस्थितीत मागील काही दिवस खाजगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या मागे फीसाठी तगादा लावत आहेत. शैक्षणिक संस्थांची अव्वाच्या सव्वा फी भरणे आर्थिक परिस्थितीमुळे पालकांना शक्य नाही. तसेच फी संदर्भात राज्य सरकारचे निर्देश आहेत. तरी कोरोना काळात फीसाठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली.