*कोकण Express*
*काँग्रेस कुडाळ तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे निधन*
सिंधुदुर्ग,दि.०४:*
कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे अल्पशा आजाराने आज पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजाराशी झुंजत होते. अनेक ठिकाणी उपचार घेऊन सध्या त्यांच्यावर गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यातून ते सावरले नाहीत. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ ते १०:३० वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर कोचरेवाडी येथील बागेत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आबा मुंज हे जिल्ह्याच्या राजकारणात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून धडाडीने काम करत होते. कुडाळ तालुक्यातील घावनळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासूपणाचा करिष्मा घावनळे मतदार संघातून दाखवून दिला होता. घावनळे दशक्रोशिवर एक हाती सत्ता ठेवणारे राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना मानले जायचे. मात्र आज त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील काँग्रेस मध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.