रानभाज्यांना बाजारापेठ उपलब्ध करून देणार -सभापती सिद्धेश रावराणे

रानभाज्यांना बाजारापेठ उपलब्ध करून देणार -सभापती सिद्धेश रावराणे

*कोंकण एक्सप्रेस*

*रानभाज्यांना बाजारापेठ उपलब्ध करून देणार -सभापती सिद्धेश रावराणे*

*वैभववाडी  : प्रतिनीधी*

कोकणातील रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. रानभाज्यांचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच स्थानिक महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी वैभववाडीत रानभाजी आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी सांगितले.

तालुका कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने एडगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पं. स. उपसभापती साची कोलते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे अध्यक्ष मंगेश कदम, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ, पं. स. सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, साधना नकाशे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, महेश संसारे आदी उपस्थित होते.

महोत्सवात सुमारे ३५ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच सुमारे १६ महिला बचत गटांनी रानभाजी पाककला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी बोलताना सिद्धेश रावराणे म्हणाले की, केवळ एक दिवस रानभाजी महोत्सव आयोजित करून रानभाज्यांचा प्रचार होणार नाही. रानभाजी महोत्सवाची संकल्पना प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. कोकणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांपासून आधुनिक पद्धतीचे खाद्यपदार्थ तयार करता येतील का, याचा विचार होणे आवश्यक आहे. कॅफेमध्ये मॅगी, बर्गर, मोमोज यांसारखे पदार्थ मिळतात. त्याच धर्तीवर रानभाज्यांपासून मोमोज व अन्य फास्ट फूड तयार करून ते बाजारपेठेत उपलब्ध करून देता येतील. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई सुरू झाल्यानंतर आपण खात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढली आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व भविष्यात आणखी वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे म्हणाले की, पूर्वीची पिढी मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचा आहारात वापर करीत होती. त्या काळात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर अत्यल्प होता. त्यामुळे नैसर्गिक, शुद्ध व पौष्टिक अन्न मिळत होते. सध्याच्या फास्टफूडच्या वाढत्या वापरामुळे आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात नैसर्गिक व पौष्टिक पदार्थांचा अधिकाधिक समावेश करण्याची गरज आहे. रानभाज्यांचा वापर वाढविण्यासाठी कृषी विभागानेही विविध उपक्रम राबवावेत, असा सल्ला त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!