वारवार वीज खांडतीवरून महावितरण कार्यालयात सत्ताधाऱ्यांचा मोर्चा…

वारवार वीज खांडतीवरून महावितरण कार्यालयात सत्ताधाऱ्यांचा मोर्चा…

*कोंकण एक्सप्रेस*

*वारवार वीज खांडतीवरून महावितरण कार्यालयात सत्ताधाऱ्यांचा मोर्चा…*

*इतके दिवस झोपला होता का..?”; बबन साळगावकरांचा सवाल; पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत न ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडणार..*

*सावंतवाडी : प्रतिनिधि*

पावसाळा तोंडावर आलेला असतानाही महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या विजेच्या संथकामांमुळे सावंतवाडीकर हैराण झाले आहेत. दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. “पावसाच्या तों डावर कामे निघतात, मग इतके दिवस तुम्ही झोपला होता का?” अशा शब्दांत खडे बोल सुनावत, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला.
यावेळी त्यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना धारेवर धरत जाब विचारला. या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, विलास जाधव, दिलीप भालेकर, नागेश जगताप, कृणाल शृंगारे आदी उपस्थित होते.

शहरात सध्या दिवसातून अनेकदा वीज खंडित होत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गासह व्यावसायिक आणि गृहिणींचे प्रचंड हाल होत आहेत. यावर अधिकाऱ्यांनी अजब समर्थन दिले. शहरात सध्या दोन फिडरवरून पुरवठा होत असून दोन्ही फिडर एकाच वेळी चालू राहत असल्याने, एका भागातील काम सुरू असताना सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहराचाच वीज पुरवठा बंद करावा लागतो, अशी माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. या उत्तरावर लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. नगरसेवक आनंद नेवगी यांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत गंभीर प्रश्न उपस्थित केला. शहरात

ठीकठिकाणी विद्युत खांब जीर्ण झाले आहेत, यापूर्वी वीज वाहिनी अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, वारंवार लक्ष वेधूनही महावितरण ढिम्म आहे, प्रशासन पुन्हा तशीच दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल त्यांनी केला. तर नगरसेविका सुकन्या टोपले यांनी मिलाग्रीस हायस्कूलसमोरील जीर्ण खांब गटारात पडल्याने एका शाळकरी विद्यार्थिनीला दुखापत झाल्याची घटना उघडकीस आणली व ते खांब तात्काळ हटवण्याची मागणी केली. भाजपा शहराध्यक्ष व सभापती सुधीर आडीवरेकर यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. पालिकेत दोन वेळा बैठक घेऊन आणि वारंवार अहवाल मागवूनही महावितरणने काहीच केले नाही, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्ती काढून जनतेला वेठीस धरले जात आहे, त्यामुळे दिवसभर कार्यालयात बसून नक्की काय करता, असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावर उपअभियंता शैलेश राक्षे यांनी आपली हतबलता व्यक्त केली. कामांसाठी खाजगी कामगार उपलब्ध होत नसून कर्मचाऱ्यांचीही मोठी टंचाई आहे, अशी अडचण त्यांनी मांडली. तरीही उपलब्ध यंत्रणेद्वारे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महावितरणच्या उत्तराने पूर्ण समाधान न झाल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी थेट कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर राक्षे यांनी वरिष्ठांशी फोनवरून चर्चा करून शहरातील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आम्ही जरी सत्तेत असलो, तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू, शहरवासीयांवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहिला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा सज्जड दम बबन साळगावकर यांनी शेवटी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!