*नृत्य करतानाच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्टीकरण*

*नृत्य करतानाच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्टीकरण*

*कोंकण एक्सप्रेस*

*नृत्य करतानाच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्टीकरण*

*सिंधुदुर्ग ः संजना हळदिवे*

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नृत्याच्या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. संबंधित व्हिडिओ हा कोणत्याही शासकीय वेळेत किंवा अधिकृत कार्यक्रमात घेतलेला नसून, कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर सहकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद आणि समन्वय वाढावा या उद्देशाने आयोजित स्नेहसंमेलनादरम्यानचा आहे. त्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ लावू नये, अशी त्यांनी नम्र विनंती केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी बोलताना त्यांच्या आवाजातली संवेदनशीलता स्पष्ट जाणवली. “बळीराजाच्या अडचणी मला पूर्णपणे जाणवतात. त्यांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा निघावा म्हणूनच मी मंत्रालयातील बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहिले. ऑनलाइन पर्याय असतानाही शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, ह्या हेतूने मी स्वतः बैठकांना उपस्थित राहिले आहे असे त्यांनी सांगितले. तसेच बळीराजाचे आंदोलन असो किंवा मोर्चा अशा आंदोलनांच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून समन्वय साधण्याचा प्रयत्न देखील केल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी नमूद केले की, जिल्हा वार्षिक नियोजनातील १०० टक्के निधी वितरण करून सिंधुदुर्गने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महसूल वसुलीतही विक्रमी कामगिरी झाली असून, ‘ब’ पत्रक पूर्णत्वास गेले आहे, तर ‘अ’ पत्रकातही उच्चांक गाठण्यात आला आहे. तसेच, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १५ कोटींच्या निधीतून २६५ कामांना चालना देत १४.४५ कोटी रुपयांचा निधी प्रभावीपणे खर्च करण्यात आला आहे.
या सर्व यशस्वी कामगिरीनंतर अधिकाऱ्यांमध्ये स्नेह आणि समन्वय वाढावा यासाठीच संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

“प्रशासनातील अधिकारी म्हणून आम्ही आमच्या कर्तव्यांप्रती पूर्णतः बांधील आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आम्ही सदैव संवेदनशील आहोत,” असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन केले.

तसेच, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!