*कोकण Express*
*निष्ठेने राहिलात, तुमच्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले!*
*आमदार वैभव नाईक यांच्या बद्दल शिवसेना पक्षप्रमुखांकडून गौरवोद्गार, कठीण काळात निष्ठेने राहिल्याबद्दल दिली कौतुकाची थाप*
*सिंधुदुर्ग :*
शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेल्या असताना या कठीण काळात शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांना शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून विशेष कौतुक केले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो. अशा सदिच्छा असे कौतुक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. याबाबतचे पत्र आमदार वैभव नाईक यांना पक्षप्रमुखांनी दिले आहे.

