*कोकण Express*
*’त्या’ कृत्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागणार…*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांचा इशारा…!*
*नविन पुतळा बसविताना विरोध करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला स्थानिक आमदारांकडून धमकी…!*
*कणकवली ः प्रतिनीधी*
कणकवली शहरातील शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हलवला गेला हे बेकायदेशीर कृत्य कणकवली नगपंचायत प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महसुल कार्यालयाचे अधिकारी अशा सर्वांच्या संगनमताने केले गेले आहे. घडल्या प्रकाराची माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागविण्यात आली असून आम्ही उच्च न्यायालयातही जाणार आहोत. या कृत्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशाराही शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिला. तर नविन पुतळा बसविताना त्याला विरोध करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला स्थानिक आमदारांकडून धमकीही दिली गेली, असा आरोपही पारकर यांनी केला. येथील विजयभवन येथे पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. याप्रसंगी शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजीत जाधव, युवा सेना पदाधिकारी राजू राठोड, राजू राणे, दामू सावंत आदी उपस्थित होते.
पारकर म्हणाले, पुतळा रातोरात हलविणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडला आहे. हे बेकायदेशीर कृत्य करण्याची मान्यता यांना कुणी दिली? हिंमत होती तर पुतळा दिवसाढवळ्या का नाही हलविला अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी ‘आम्हाला माहीत नाही’ असे उत्तर दिले. पण, या अधिकाऱ्यांनीच नीतेश राणे यांना पुतळा हलविण्याची सुपारी दिली. अधिकाऱ्यांना याची किंमत मोजावीच लागेल. कणकवली शहरातील हायवेबधित झालेल्या शिवाजी महाराज पुतळ्याचे स्थलांतर जि. प. च्या १८ गुंठे जागेत व्हावे व तेथे महाराजांच्या पराक्रमाला शोभेल असे भव्यदिव्य स्मारक उभे रहावे, ही शिवसेनेची भूमिका आहे. शासकीय जागेत महाराजांचे स्मारक होत नाही तोपर्यंत शिवसेन गप्प बसणार नाही. कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांतर्फे रात्रीस खेळ चाले सुरु असून रात्रीच्यावेळी दरोडो घातले जातात. काही दिवसांपूर्वी पूर्वीपासून असलेल्या पुतळ्यापासून नजीकच्या अंतरावर नवा पुतळा रात्रीच्या सुमारास बसविला गेला. तर पूर्वीचा पुतळा हलविण्याची कारवाईही रात्रीच्या सुमारासच केली गेली. यापूर्वी कणकवली शहरात इमारत पाडण्याचे प्रकार न. पं. सत्ताधाऱ्यांकडून घडले.

