नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम

कोंकण एक्सप्रेस
नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम
शाळा-महाविद्यालयांत होणार अचानक तपासणी
एमआयडीसी, निर्जन ठिकाणांवरील उद्योग, कारखाने याठिकाणांचाही समावेश
नवरात्रीत जनजागृतीवर विशेष भर
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व व्यसनांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नशामुक्ती अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्तीशी संबंधित वेगवेगळ्या मात्र एकसमान विषयाच्या तीन महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. या बैठकीत शाळा-महाविद्यालयांपासून औद्योगिक परिसर, जेट्टी आणि पोस्ट ऑफिसपर्यंत तपासणी व जनजागृती मोहीम अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस सहायक आयुक्त समाजकल्याण संतोष चिकणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्यासह शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी महाविद्यालयांतही मोहीम
राष्ट्रीय अंमली पदार्थ समन्वय बैठकीत शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. आतापर्यंत शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या जनजागृती आणि तपासणी मोहिमेचा विस्तार आता महाविद्यालयांमध्येही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेची सुरुवात होऊ नये, तसेच ड्रग्जच्या आहारी जाण्याचे प्रकार रोखता यावेत यासाठी विविध पथकांच्या माध्यमातून रँडम तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
एमआयडीसीपासून जेट्टीपर्यंत अचानक तपासणी
अमली पदार्थांच्या वापराला आणि संभाव्य तस्करीला आळा घालण्यासाठी केवळ शैक्षणिक संस्थांपुरती मोहीम मर्यादित न ठेवता औद्योगिक आणि इतर संवेदनशील ठिकाणीही तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. एमआयडीसी परिसर, निर्जन ठिकाणी असलेले लघुउद्योग, कारखाने तसेच विविध व्यवसायांची अचानक पडताळणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर जेट्टी आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या ठिकाणीही तपासणी मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या माध्यमातून अमली पदार्थांची उपलब्धता, वापर आणि संभाव्य वितरणाच्या मार्गांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या बैठकीत जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात जनजागृती उपक्रम राबविल्यानंतर आता नवरात्रीच्या उत्सवातही नशामुक्तीचा संदेश मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उत्सव, शैक्षणिक उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम तसेच अमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत जागृती करण्यात येणार आहे.
व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती
यानंतर १ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान व मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना’ जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. शासन निर्णयानुसार समितीची रचना, जबाबदाऱ्या आणि कामकाजाची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी बैठकीत सादर केली. व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यसनमुक्ती सेंटर सुरू करण्याबाबत आवश्यक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जनजागृतीसोबतच व्यसनाधीन व्यक्तींना उपचाराची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेला महत्त्व देण्यात आले.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस
ब्रेकिंगजलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम
ब्रेकिंगक्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*
ब्रेकिंग