साळशी बौद्धवाडी येथील कु. सुमेधा साळसकर हि दिल्ली येथे भारतीय वायूदलात देशसेवेत रुजू

साळशी बौद्धवाडी येथील कु. सुमेधा साळसकर हि दिल्ली येथे भारतीय वायूदलात देशसेवेत रुजू

*कोंकण एक्सप्रेस*

*सावित्रीच्या लेकीची गरुडझेप..!*

*साळशी बौद्धवाडी येथील कु. सुमेधा साळसकर हि दिल्ली येथे भारतीय वायूदलात देशसेवेत रुजू*

*शिरगांव : संतोष साळसकर*

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” डॉ. बाबासाहेबांनी समाजाला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महामंत्र दिला. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी समाजाला आपल्या अन्यायाची, अत्याचाराची आणि गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग दाखवला.
आज त्याच विचारांची फळे आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहेत. बहुजन समाजातील मुले-मुली उच्च शिक्षण घेऊन देशातील विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. शिक्षणाची एक-एक पायरी चढत ते मोक्याच्या जागांवर पोहोचत आहेत.
समाज पुढे न्यायचा असेल तर मोक्याच्या जागा पटकावल्या पाहिजेत. समाजाची प्रगती झाली तर देशाचा उद्धार होईल. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारी आजची पिढी हेच कार्य पुढे नेत आहे. याच परिवर्तनाच्या वाटेवर साळशी गावातील एका कन्येने आज अभिमानाची नवी उंची गाठली आहे.
देवगड तालुक्यातील साळशी – बौद्धवाडी येथील सुपुत्री कु. सुमेधा सुधीर साळसकर हिने अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एअर फोर्स ऑफिसर म्हणून आपले नियोजित प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, आता ती दिल्ली येथे भारतीय वायुदलात देशसेवेसाठी रुजू होत आहे.
सुधीर साळसकर आणि सौ. समीक्षा साळसकर यांच्या ज्येष्ठ कन्येने मिळवलेले हे यश केवळ तिच्या आई-वडिलांचे यश नाही, तर संपूर्ण साळशी गावासाठी, देवगड तालुक्यासाठी आणि बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
एका छोट्याशा गावातील मुलगी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून देशसेवेत प्रवेश करते, ही बाब पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. साळशी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे यश आहे.
सुमेधाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देवगड तालुक्यासह मुंबई आणि पुणे येथे तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध ठिकाणी तिचा सत्कार व सन्मान केला जात आहे. याच अभिमानाची दखल घेत साळशी बौद्धजन जीवनोन्नती मंडळ, साळशी मुंबई शाखेच्या वतीने सुमेधा हिच्या घरी जाऊन तिचा तसेच तिच्या आई-वडिलांचा पुष्पगुच्छ, शाल आणि मिठाई देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी आणि देशसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मुंबई शाखेचे अध्यक्ष तथा लेखक ,गीतकार ,संगीतकार ,
साहित्यिक प्रसाद साळसकर
माजी अध्यक्ष दिलीप (भाई) साळसकर, मुंबई शाखेचे सचिव गौतम साळसकर, खजिनदार शरद साळसकर, उपाध्यक्ष सतीश साळसकर, तसेच अभिनय साळसकर, राजेंद्र साळसकर, संभाजी साळसकर व त्यांच्या सौभाग्यवती, विद्याधर साळसकर आणि प्रजाल साळसकर उपस्थित होते.
सुमेधाची ही गरुडझेप म्हणजे केवळ एका मुलीचे वैयक्तिक यश नाही; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालत बहुजन समाजाची नवी पिढी कशी उंच भरारी घेत आहे, याचे जिवंत उदाहरण आहे.
आज सुमेधा भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून देशसेवेत जात आहे. उद्या तिच्याकडे पाहून साळशीतील आणि संपूर्ण समाजातील असंख्य मुली-मुले मोठी स्वप्ने पाहतील आणि ती पूर्ण करण्यासाठी शिक्षणाची वाट धरतील. हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी फलश्रुती…
हीच शिक्षणक्रांतीची खरी ताकद…
आणि हीच सावित्रीच्या लेकीची खरी गरुडझेप असे प्रसाद साळसकर यांनी बोलताना व्यक्त केले. कु. सुमेधा सुधीर साळसकर हिचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!