*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना सावंतवाडी येथे पाठिंबा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी झारखंड सरकार व पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष कारवाईचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लाठीमार किंवा दडपशाहीचा मार्ग न अवलंबता त्यांच्या मागण्यांवर संवादातून आणि न्यायाच्या भूमिकेतून तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर लाठीने नव्हे, तर न्यायाने द्या!” अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा तातडीने विचार करून त्यावर योग्य, न्यायपूर्ण व सकारात्मक तोडगा काढावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले

