*कोंकण एक्सप्रेस*
*’एका घरात नेमके किती भाडेकरू?’; बोगस मतदार नोंदणीविरोधात नगराध्यक्ष संदेश पारकरांचे १५ ऑगस्टला उपोषण!*
*कणकवली ः संजना हळदिवे*
“राज्याचा मुख्यमंत्री हा राज्यातील खऱ्या मतदारांनीच ठरवावा,” या भूमिकेतून कणकवलीत बोगस आणि दुबार मतदार नोंदणीविरोधात नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाला सलग चार पत्रे देऊनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने, अखेर येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आपण उपोषणाला बसणारच, असा खणखणीत इशारा संदेश पारकर यांनी दिला आहे. कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
प्रशासनाच्या मौनावर तीव्र नाराजी
भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे पारकर यांनी आतापर्यंत चार वेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे. १३ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने या मुद्द्यावर चर्चेला यावे किंवा मागण्यांबाबत लेखी उत्तर द्यावे, असा अल्टिमेटम त्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
नेमका आक्षेप कशावर?
भाडेकरूंच्या नोंदीवर प्रश्नचिन्ह: शहरात ‘भाडेकरू’ म्हणून एकाच घरात नक्की किती जण राहतात? असा थेट सवाल उपस्थित करत, कुटुंबाच्या नोंदणीच्या नावाखाली चुकीची माहिती भरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दुबार नोंदणीला आळा बसावा: ज्या व्यक्तीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, तिथेच त्याची मतदार म्हणून योग्य नोंदणी व्हावी. काही संशयास्पद मतदारांच्या नोंदणीचे पुरावेही त्यांनी प्रशासनाला सादर केले आहेत.
पारकर यांच्या प्रमुख मागण्या:
प्रक्रिया पारदर्शक करा: मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक आणि अन्य शासकीय यंत्रणांचा वापर होतो. यात जनतेचा पैसा खर्च होत असल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार आणि पारदर्शक असावी.
नियम स्पष्ट करा: वास्तव्याचा दाखला म्हणून नक्की कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जातात? मतदार नोंदणीची नेमकी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? याची आकडेवारी आणि लेखी स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे.
”बोगस नोंदणीवर कारवाई झालीच पाहिजे”
“जनतेच्या पैशातून राबवली जाणारी मतदार नोंदणी अचूकच असली पाहिजे. बोगस नोंदणी होत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई व्हावी. प्रशासनाने योग्य चर्चा करून लेखी उत्तर दिले नाही, तर लोकशाही मार्गाने आवाज उठवण्यासाठी मी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) उपोषणाला बसणार आहे,” असा ठाम निर्धार संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

