*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत पोलिसांची धडक कारवाई: १.७९८ किलो गांजासह दोन आरोपींना अटक; १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त*
*कणकवली : संजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ७९८ ग्रॅम गांजासह दोन मोटारसायकल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये एका विधिसंघर्ग्रस्त बालकाचाही (अल्पवयीन) समावेश आहे.
घटनेची पार्श्वभूमी
कणकवली पोलीस ठाणे हद्दीतील गांगो मंदिर ते गणपती साना जाणारे डांबरी रस्त्यालगत, टेंबवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ काही इसम गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांना अवगत करून, दोन पंच व प्रमाणित वजनकाटाधारकांना सोबत घेऊन पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला.
सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोघा जणांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अमली पदार्थ मिळून आला.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
१. सूर्यकांत राघो घाडीगावकर (वय २९ वर्षे, रा. वागदे देऊळवाडी, ता. कणकवली)
२. विधिसंघर्ग्रस्त बालक
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत अंदाजे १,८०,०००/- रुपये)
गांजा: ६०,०००/- रुपये किमतीचा, दोन पारदर्शक प्लॅस्टिक पिशवीत हिरवट रंगाचा उग्रवास येत असलेला १.७९८ किलोग्रॅम गांजा (वजनकाटाधारकाकडून वजन केलेले).
यामाहा फसीनो दुचाकी: ८०,०००/- रुपये किमतीची आकाशी रंगाची दुचाकी (क्रमांक: MH 07 AQ 4088) जुन्या वापरत्या चावीसह.
हिरो स्प्लेंडर दुचाकी: ४०,०००/- रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी (क्रमांक: KA 32 HH 1214) जुन्या वापरत्या चावीसह.
यशस्वी कारवाई करणारी पोलीस टीम
सदरची धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक मा. कु. नयोमी साटम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय डॉमीनिक डिसोझा, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालवीस, तसेच पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर व कांडर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

