सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे*

*तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश*

*मुंबई*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज यंत्रणांना दिले.

मंत्री श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी मंत्री श्री राणे म्हणाले, हवामानातील बदल व तापमानवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी व कागदपत्रांतील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळू शकलेला नाही. या सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी. काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचे निदर्शनास आले असून, त्या प्रकरणांची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करावे. हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांतील अडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदीअभावी लाभ न मिळाल्याच्या तक्रारींबाबतही योग्य ती कार्यवाही प्राधान्याने करावी. तसेच आजगाव महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींमुळे अत्यल्प भरपाई मिळाल्याच्या प्रकरणाबाबतही उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री श्री. राणे यांनी दिले.

यावेळी मंत्री श्री राणे म्हणाले, संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि अशा तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला असून. अशा बिकट प्रसंगी शासन या शेतकऱ्यांना सर्वतोपारी मदत करण्यास बांधील आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री राणे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!