सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन  महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी व पुढील अनुषंगिक कार्यवाही करणेबाबत कळविले होते. त्यानुसार
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India), मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उप-मंडल चे संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, देवबाग ग्राम महसूल अधिकारी श्री वायाळ व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी नुकतीच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील अलीकडेच ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी दिनांक 19 जुलै 2026 च्या संध्याकाळी केली.

या पाहणीदरम्यान ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता, दगडी बांधकामाची अवस्था तसेच समुद्री लाटा, भरती-ओहोटी आणि पावसामुळे झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक तांत्रिक निरीक्षणे व मोजमाप करून संवर्धनासाठी उपयुक्त माहिती संकलित करण्यात आली.
पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन व आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या अलीकडील पडझडीमुळे त्याच्या संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित झाली असून, ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!