*कोंकण एक्सप्रेस*
*”स्मार्ट मीटरला विरोध केला तर गुन्हा ?” : आंदोलनकर्त्यांवर सायबर कारवाईचा आरोप; वीज ग्राहक संघटना आक्रमक, संघर्ष तीव्र करण्याचा इशारा !*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
राज्यभर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या स्मार्ट वीज मीटरच्या मुद्द्यावर आता आंदोलन करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेने केला आहे. वाढीव वीज बिले, खासगी कंपनीचा हस्तक्षेप आणि सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याविरोधात भूमिका घेणाऱ्या नागरिकांना, तसेच या विषयावर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप संघटनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुभाष दळवी आणि सचिव भूषण सावंत यांनी केला.
सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, पत्रकार सागर चव्हाण तर स्मार्ट मीटर चर्चासञात भाग घेतल्याने दीपक पटेकर यांना महाराष्ट्र सायबर विभागाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावली आहे. “स्मार्ट मीटरमध्ये गुप्त कॅमेरे आहेत” असा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत FIR क्र. 43/2026 नोंदविण्यात आला असून, त्यांना 22 जुलै 2026 रोजी नवी मुंबई येथील नोडल सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सुधीर दळवी यांनी सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. “जनतेच्या शंकांचे निरसन करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. स्मार्ट मीटरविरोधात हजारो ग्राहकांनी महावितरणकडे लेखी अर्ज दिले, अनेकांनी पोलिस ठाण्यांत तक्रारी केल्या. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. हा लोकशाहीवरील थेट आघात आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सवाल उपस्थित करत म्हटले, “महावितरणचे अधिकारी स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नाही, असे लेखी देण्यास तयार नाहीत. मग ग्राहकांच्या शंका चुकीच्या कशा ठरवल्या जात आहेत? प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का ?”
वीज ग्राहक संघटनेच्या मते, अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकार आणि प्रशासन एकत्रितपणे विरोधकांवर दबाव आणत आहे. वाढीव वीज बिलांनी आधीच त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता पोलिस कारवाईची भीती दाखवून गप्प बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
संघटनेने या नोटिशीचा तीव्र निषेध नोंदवत स्पष्ट इशारा दिला आहे की, स्मार्ट मीटरबाबत जनतेच्या सर्व शंकांचे समाधान होत नाही, सक्तीने मीटर बसविणे थांबत नाही आणि वाढीव वीज बिलांबाबत पारदर्शक खुलासा केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील वीज ग्राहक संघटना आणि सरपंच संघटना याबाबत आपली भूमिका जाहीर करतील, असेही संघटनेने सांगितले.
ठळक मुद्दे :
⚡ स्मार्ट मीटरविरोधात भूमिका घेतल्याप्रकरणी वीज ग्राहक संघटनेच्या समन्वयकांसह पत्रकारांना सायबर पोलिसांची नोटीस.
⚖️ FIR क्र. 43/2026 अंतर्गत गुन्हा नोंद.
❓ “प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का?” – वीज ग्राहक संघटनेचा थेट सवाल.
📢 सरकार व प्रशासन जनतेचा आवाज दाबत असल्याचा गंभीर आरोप.
✊ सक्तीचे स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार.
🏛️ लवकरच सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांतील संघटना भूमिका स्पष्ट करणार.

