*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण महाविद्यालयात एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात*
*खारेपाटण : प्रतिनिधि*
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि विद्यार्थी कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेत यशाचा मार्ग : स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी युनिक अकॅडमीचे श्री. सचिन कोर्लेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी एमपीएससी व यूपीएससी परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, स्पर्धा परीक्षांतील संधी तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे करिअरची सुवर्णसंधी म्हणून पाहण्याचे आवाहन करत सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी देसाई यांनी केले. प्रास्ताविक डॉ. वंदना शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विघ्नेश सावंत यांनी केले.

