*कोंकण एक्सप्रेस*
*एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवलीत भव्य वृक्षारोपण; नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या हस्ते प्रारंभ*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात १,२५० हून अधिक वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (१४ जुलै) राज्यभर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. याच उपक्रमाचा भाग म्हणून कणकवली एसटी कार्यशाळा परिसरात कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा कृतीशील संदेश देण्यात आला.
विविध ठिकाणी १,२५० वृक्षांची लागवड
पर्यावरण पूरक संकल्पना राबवत एसटी प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १,२५० वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये विभागीय कार्यालयात १००, विभागीय कार्यशाळेत १५० आणि कणकवली आगारात १४० अशा विविध ठिकाणी सुरंगी, खैर यांसारख्या स्थानिक व औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत लावलेली झाडे जगवण्याचा आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक संकेत नाईक, अवधूत मालंडकर, काशिनाथ मेस्त्री, सचिन सावंत, अजित सावंत, रामदास मांजरेकर, कृष्णा केणी, दर्शन सावंत, फ्रँकी लोगो आदी मान्यवर उपस्थित होते.
एसटी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कणकवली विभाग नियंत्रक दीपक धोंडिबा घोडे, यंत्र अभियंता (चालन) पांडुरंग वाघमोडे, विभागीय भांडार अधिकारी संजय बंगडे, विभागीय लेखा अधिकारी सुवर्णा दळवी (शिंदे), सहायक यंत्र अभियंता मृदुला जाधव, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) निलेश लाड, विभागीय अभियंता (स्थापत्य) अक्षय केकरे, कनिष्ठ अभियंता तारळेकर, इमारत निरीक्षक स्नेहल मुंज, वाहतूक पर्यवेक्षक राकेश शिंदे यांच्यासह एसटीचे सर्व आगार अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

