*कोंकण एक्सप्रेस*
*रक्तदान ही केवळ सामाजिक सेवा नसून ‘काळाची गरज आणि राष्ट्रीय कर्तव्य’: नगराध्यक्ष संदेश पारकर*
*कणकवली महाविद्यालयात ‘कै. सुबोध टिकले’ यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर; ५०० हून अधिक रक्तपिशव्या गोळा करण्याचा संकल्प*
*कणकवली ः संजना हळदिवे*
“औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कारखान्यात तयार होऊ शकतात, पण रक्त केवळ माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकते. विज्ञानाने रक्ताला अद्याप कोणताही पर्याय शोधलेला नाही. त्यामुळे स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करणे ही केवळ एक सामाजिक सेवा नसून ‘काळाची गरज आणि राष्ट्रीय कर्तव्य’ आहे,” असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल (HPCL) सभागृहात ‘कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ’ भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मानवतेचे सर्वोच्च दान
कार्यक्रमाची सुरुवात संदेश पारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि कै. सुबोध टिकले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या प्रसंगी बोलताना पारकर म्हणाले की, “माझे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या प्रेमामुळेच मला नेहमी सामाजिक कार्याची ऊर्जा मिळते. माझे मित्र कै. सुबोध टिकले हे सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते, त्यांचे विचार जपणे हे आमचे कर्तव्य आहे. गेली १६ वर्षे आम्ही सातत्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपत आहोत.” रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च दान असून ते अनेकांना नवजीवन देते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दिग्गजांची उपस्थिती
या भव्य शिबिराच्या व्यासपीठावर माजी आमदार विजय सावंत, डॉ. अनंत नागवेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक बाळू पारकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे उपस्थित होते. तसेच नगरसेविका जाई मुरकर, दीपा सुमेधा अंधारी, माजी नगरसेवक विलास कोरगावकर, दिवाकर मुरकर, भाई परब, युवा नेते सौरभ पारकर, सुनील पारकर, कौशिक पारकर, सुनील हरमळकर, संतोष पुजारे, सी. आर. चव्हाण, दिव्या साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमांचा धडाका
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. या शिबिरादरम्यान ५०० रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. याशिवाय, वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कणकवलीतील नागरिक आणि तरुणांनी या शिबिराला प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

