*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीत ‘अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी’ची नवी सुरुवात; गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणातून घडणार उद्याचे खेळाडू..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यात क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी’ सुरू करण्यात आली आहे. दर्जेदार प्रशिक्षक, अनुभवी मार्गदर्शक आणि खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असलेले सर्वांगीण प्रशिक्षण ही अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
अकॅडमीला कृष्णात पाटील (NIS Coach) यांचे मार्गदर्शन लाभणार असून अनिकेत पाटील (NIS Coach) आणि सुजल गवस (राष्ट्रीय खेळाडू) हे प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. आतापर्यंत अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाइन वर्कआउट व प्रशिक्षण देण्यात येत होते. या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ऑनलाइन प्रशिक्षणातून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मेघा सातपुते हिने फोर्थ एडिशन स्टेट लेव्हल गेम्स, नाशिक येथे ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आशीर्वाद सातपुते याने पारगड मॅरेथॉन ५ किलोमीटर धाव स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. आस्था लिंगवत हिने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल ज्युनियर ट्रायथलॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर मैथिली गावडे हिने त्याच स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तसेच महिमा मोहिते हिने अंतरशालेय कोल्हापूर विभागीय स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर आणि लाँग जंप या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. स्वराज सुर्वे याने ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील १५०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीनंतर ऑनलाइन प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष मैदानावर ऑफलाइन कोचिंग सुरू करण्याचा निर्णय अकॅडमीने घेतला आहे. क्रीडा क्षेत्रात नवीन भरारी घेण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीने ही नवी सुरुवात केली असल्याची माहिती अकॅडमीच्या वतीने देण्यात आली.

