निकाल रखडल्याने पालक संतप्त.

निकाल रखडल्याने पालक संतप्त.

*कोंकण एक्सप्रेस*

*निकाल रखडल्याने पालक संतप्त.!*

*पाच विद्यार्थ्यांनी घेतले शाळा सोडल्याचे दाखले.!*

*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप.!*

*बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलविरोधात कायदेशीर लढ्याचा इशारा.!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

बारावी परीक्षेतील कथित गैरप्रकार, निकालातील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हुंबरठ येथील बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुवारी पालक, विद्यार्थी तसेच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देत संस्थाचालकांना जाब विचारला. मात्र यावेळी कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भावनांशी खेळ केला जात असून त्यांच्या मानसिक त्रासाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट द्या, आम्ही आमच्या मुलांना दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश देतो, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली. अखेर १० पैकी ५ विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले देण्यात आले.

आयएससी बारावी परीक्षेला बसलेल्या १० विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अडथळे निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला. या प्रकरणाचा मुद्दा बुधवारी कणकवली पंचायत समितीच्या सभेतही गाजला होता. शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांनी बारावी परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि निकालातील गोंधळाचा प्रश्न उपस्थित केला होता. बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तसेच परीक्षेदरम्यान फळ्यावर लिहिलेली उत्तरे उतरविल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सारख्याच असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली होती.

गुरुवारी झालेल्या भेटीदरम्यान ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन तब्बल ३५ दिवस उलटून गेले तरी त्यांना निकाल देण्यात आलेला नाही. संबंधित प्रशालेने ३ जून रोजी निकाल जाहीर करू, असे सांगितले होते. मात्र ४ जून रोजी विचारणा केल्यानंतर आणखी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली. यापूर्वी संस्थाचालकांनी लेखी स्वरूपात ३ जून नंतरही निकाल न दिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान भरून देण्याची तयारी दर्शविली होती, असा दावा त्यांनी केला. प्रशासनाकडे सादर झालेल्या चौकशी अहवालातही प्रशालेची चूक असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करत श्री. नाईक म्हणाले, या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून काही विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या नुकसानालाही सामोरे जावे लागू शकते. वारंवार संपर्क साधूनही केवळ तोंडी आश्वासने दिली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांनी सांगितले की, पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आला असून त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होणार आहे. प्रशालेने केवळ मुदतवाढ मागण्याची भूमिका घेतली आहे. ३ जूनपर्यंत निकाल देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच निकाल न दिल्यास आर्थिक नुकसान भरून देण्याची तयारीही लेखी स्वरूपात दर्शविण्यात आली होती. मात्र अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. विद्यार्थ्यांची अकरावीची गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला आणि अन्य आवश्यक कागदपत्रे देऊन त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी द्यावी. अशी मागणी केली.

यावेळी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनीही गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संस्थाचालकांनी आपल्या नातेवाईकांना गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळावे यासाठी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केला. वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मागे असलेल्या फळ्यावर उत्तरे लिहिली जात होती, तसेच संबंधित विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत बसवून मदत पुरविली जात होती. प्रशालेने केवळ सुमारे ५० टक्के अभ्यासक्रम शिकवला असून उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यास सांगितल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. याबाबत प्रश्न विचारल्यावर धमक्या देण्यात आल्याचाही दावा विद्यार्थ्यांनी केला.

उपस्थित पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत, आमच्या मुलांची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे परत द्या. आम्ही त्यांना कुठे शिक्षण द्यायचे ते ठरवू. आता आश्वासनांची गरज नाही, अशी भूमिका मांडली. मात्र यावर संस्थाचालकांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शाळा सोडल्याचे दाखले देण्याची मागणी लावून धरली. यावेळी संस्थेचे सचिव विवेक विजयकर यांनी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करण्याची विनंती केली. मात्र पालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर १० पैकी ५ विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले देण्यात आले. या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि जबाबदारांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर लढा उभारला जाणार असल्याचे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश चव्हाण, तालुका सदस्य कीर्ती आंबेडकर, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, पालक किशोर ठाकरे, कालिदास परब तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

*बॉक्स :*
*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ : लक्ष्मण गावडे*

बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल इतके दिवस रखडून ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. निकाल न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित संस्थेने तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा. विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेवर राहील. विद्यार्थी आणि पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. प्रसंगी या प्रशालेविरोधात आम्हाला न्यायालयात जावे लागले तरी जाऊ, असा इशारा पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!