*कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक व्यापारी संकुलाची दुरवस्था*
*नवीन इमारतीसाठी व्यापारी सरसावले!*
*नगराध्यक्ष संदेश पारकर, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे राजेंद्र पेडणेकर यांच्यामार्फत नव्याने इमारत बांधण्याची मागणी-
*पत्रकारांचे मानले आभार*
*कणकवली: प्रतिनिधि*
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायत व्यापारी (भाजी मार्केट) संकुलाची इमारत सध्या अत्यंत दुरवस्थेत पोहोचली असून ती पूर्णतः नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर, येथील ६० ते ७० व्यापारी हतबल झाले असून, या इमारतीचे पुनरुज्जीवन करून ती नव्याने बांधून देण्यात यावी, अशी आर्त हाक व्यापारी श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना दिली आहे.
संदेश पारकर यांच्या पहिल्या कार्यकाळातील आठवण
हे व्यापारी संकुल जेव्हा पहिल्यांदा उभारण्याचा प्रयत्न झाला, तो काळ माननीय श्री. संदेशजी पारकर साहेब पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले होते तो होता. मात्र, आज या इमारतीला तब्बल ४० ते ४५ वर्षे पूर्ण झाली असून इमारतीची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पारकर साहेबांनी स्वतः या जागेची पाहणी करावी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी ही इमारत काहीही करून नव्याने बांधून द्यावी, अशी विनंती व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलाय शब्द!
या गंभीर समस्येची दखल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री. नितेशजी राणे साहेब यांनीही घेतली असून, त्यांनी हे संकुल नव्याने उभारून देण्याचा शब्द व्यापाऱ्यांना दिला आहे. दरवर्षी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त पालकमंत्री जेव्हा येथे येतात, तेव्हा पेडणेकर मार्केटचा विषय नेहमीच अजेंड्यावर असतो. व्यापाऱ्यांनीही पालकमंत्र्यांच्या या आश्वासनाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
व्यापाऱ्यांचे आवाहन आणि एकजूट:
“या विषयावर ‘माऊली मित्र मंडळ’ ग्रुपवरील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील अनेक व्यापारी एकत्र आले आहेत. सर्वांनी मिळून आता आपले स्पष्ट मत मांडण्याची वेळ आली आहे. पालकमंत्र्यांसमोर भूमिका मांडायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
— श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर (९५०३००५१६३)
जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर आणि मीडियाचे आभार
या व्यापारी संकुलनासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. अशोक काका करंबेळकर यांचे व्यापाऱ्यांनी विशेष आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे, ही इमारत व्हावी म्हणून आजवर सातत्याने बातम्या लावून धरणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचे—विशेषतः प्रहार, तरुण भारत, रत्नागिरी टाईम्स, लोकमत आणि सर्वच प्रिंट व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांनी व्यापाऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल राजेंद्र पेडणेकर यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
आता लोकप्रतिनिधी, नगरपंचायत आणि व्यापारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई-गोवा महामार्गावरील हे महत्त्वाचे व्यापारी संकुल कधी नव्याने उभे राहते, याकडे संपूर्ण कणकवलीकरांचे लक्ष लागले आहे.

