*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उबाठा पक्षाच्या कलमठ ग्रा.प.सदस्य योगिता लवु चव्हाण अपात्र : कलमठ मध्ये उबाठाला मोठा धक्का*
*सलग सहा महिने सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या कलमठ ग्रामपंचायत च्या सदस्य योगिता लवु चव्हाण या ग्रामपंचायत च्या मासिक सभांना सलग सहा महिने पेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने त्यांना जिल्हा परिषदचे प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी अपात्र ठरवले आहे. 23 जानेवारी 2023 ते 24 जुलै 2023 पर्यंतच्या काळात सलग २१ सभांना गैरहजर राहिल्या. सर्व मासिक सभांना योगिता चव्हाण या सलग सहा महिने पेक्षा जास्त काळ कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिल्या होत्या. तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाला झाल्यानंतर हे सदस्यपद रद्द करण्यात आले आहे.
यापूर्वी योगिता चव्हाण यांना ग्रामपंचायत सदस्य रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. तसेच गटविकास अधिकारी कणकवली यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता. योगिता चव्हाण यांनी नोटीस ला कोणताही समाधानकारक व नियमानुसार खुलासा दिलेला नाही.
त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 40 (1) (ब) नुसार त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कलमठ मध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

