*कोकण Express*
*सिंधुदुर्गातल्या एकाही विज ग्राहकाचा विज पुरवठा मला सांगितल्या शिवाय खंडीत करायचा नाही*
*मालवण ः प्रतिनिधी*
कोरोना काळात लागू करण्यात आलेली वाढीव विजबिले आणि बिल न भरल्याबाबत होणारी वीज मीटर तोडणी याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन लक्ष वेधले असता सिंधुदुर्गातल्या एकाही विज ग्राहकाचा विज पुरवठा मला सांगितल्या शिवाय खंडीत करायचा नाही आणि कोरोना टाळेबंदी मुळे आधिच अडचणीत आलेल्या व्यापारी वर्गाने विज बिल भरण्या बाबत दिलेल्या प्रस्तावा नुसार सर्वांना हप्ते बांधून द्या, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणला दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसा पासून विज कंपनीने थकबाकीदार ग्राहकांचा विजपुरवठा खंडीत करण्याच्या सुरू केलेल्या टोकाच्या कारवाईला पायबंद बसून कोरोना मुळे आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक विज ग्राहकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे असे मत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी व्यक्त केले आहे. कोरोना टाळेबंदीच्या काळात दिलेली सरासरी विज देयके आपणास मान्य नाहीत, कोरोना काळात लागू करण्यात आलेली विज दरवाढ परत घ्या, कोरोना काळातील वापरलेल्या विजेच्या रकमे व्यतिरिक्त अन्य सर्व कर, आकार व व्याज माफ करा, कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यातील विज देयके ही विवादीत बाब म्हणून कल्पून ॲाक्टोबर पासूनची देयके स्विकारा, टाळेबंदीच्या काळातील विज देयके भरण्यासाठी हप्ते बांधून द्या आदी मागण्यांसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने शासन, प्रशासन व कंपनी कडे अर्ज व निवेदने सादर केली होती. त्या बाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास १ मार्च नंतर संवैधानिक मार्गानी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान विज कंपनीने थकबाकीदारांचा विजपुरवठा खंडीत करण्याची टोकाची कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्य विज ग्राहकांत अस्वस्थता पसरू लागली होती. या पार्श्वभुमिवर आज जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांची भेट महासंघाने मागितली होती. नाम.सामंत यांनीही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाह निलेश धडाम, द्वारकानाथ घुर्ये, अशोक गाड, संजय भोगटे, राजन नाईक, कुडाळ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, गोविंद सावंत, नितीश म्हाडेश्वर, भूषण मठकर, प्रसाद शिरसाट, शार्दूल घुर्ये, अनिकेत नेवाळकर, जिल्हा डिस्ट्रीब्यूटर्स असो.चे विवेक नेवाळकर आदींचा सदस्यांसह महासंघाच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे पालकमंत्र्याची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. पालकमंत्री उदय सांमत यांनीही व्यापाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची तयारी दर्शवित भ्रमणध्वनी वरून विजवितरणच्या अधिकाऱ्यांना कोणाचाही विज पुरवठा खंडीत न करण्याचे आणि थकीत रकमे बाबत हप्ते बांधून देण्याचे आदेश दिले. पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी संवेदनशीलता दाखवित तातडीने सुयोग्य आदेश निर्गमित केल्या बद्दल महासंघाचे अध्यक्षांनी मंत्रीमहोदयांना धन्यवाद देत विशेष आभार मानले आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशा नुसार थकीत विज बिलाच्या प्रश्नी हप्ते बांधून घेणे व अन्य बाबींबाबत जिल्हास्तरावर एकच सुनियोजित धोरण आखून घेण्यासाठी महासंघा मार्फत महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही श्री.तायशेटे यांनी दिली.