*कोकण Express*
*उत्कृष्ट तलाठी पुरस्कार प्राप्त अर्जुन पंडित यांचा फोंडाघाट ग्रा. पं. मार्फत करण्यात आला सत्कार*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
महसूल-दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात, उत्कृष्ट तलाठी म्हणून फोंडाघाटचे तलाठी अर्जुन पंडित यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात आलेला हा शासकीय सन्मान सत्कार-मूर्तींची जबाबदारी वाढवणारा आहे, अशा शब्दांत उपस्थित जिल्हा अधिकाऱ्यांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.
उत्कृष्ट तलाठी अर्जुन पंडित यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल, फोंडाघाट ग्रामपंचायतीमध्ये सरपंच संतोष आग्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तलाठी अर्जुन पंडित म्हणाले, आजवर मालवण तालुक्यातील मसुरे- मर्डे, कणकवली तालुक्यातील भिरवंडे-सांगवे आणि आत्ता फोंडाघाट मधील दोन वर्षे, प्रशासकीय चौकटीत काम करताना, ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरीब, अशिक्षित जनतेला बरोबर घेऊन, त्यांना दिलेल्या प्रामाणिक सेवेचा हा बहुमान आहे. त्यासाठी बारा वर्षे सेवा दिली. वस्तूतः महसूल विभागात किचकट कामे, लोकांची नाराजी, वादातीत प्रसंगांना सामोरे जात, कसरत करीत सर्वांना सांभाळून घेऊन तत्पर सेवा देताना, आपले काम बरे या सर्वंकष वर्तनामुळे आणि फोंडावासीय तसेच अधिकारी – कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आज माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण अनुभवीत आहे. मला आजवर सहकार्य केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यावेळी भाऊंना पुरस्कार देऊन फोंडावासियांचा शासनाने गौरव केला आहे, असे अभिनंदनपर उद्गार सरपंच संतोष आग्रे यांनी काढले. बबनमामा हळदिवे, सुभाष मर्ये, संजय सावंत, रंजन नेरुरकर, शामल म्हाडगुत, सुनिल तारळेकर, विश्वनाथ जाधव, वैभवी पंडीत, कुमार नाडकर्णी व कर्मचारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने महसूल विभागात जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा महसूल-दिनी गौरव केला. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी त्यांना सन्मानित केले. यामध्ये कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह सेवानिवृत्त लिपिक शिवाजी परब, वाहन चालक अरुण जोगळे, (कणकवली) कोतवाल अरविंद रावराणे (ओसरगाव) आणि फोंडाघाट तलाठी अर्जुन पंडित यांचा समावेश आहे. एक ऑगस्ट रोजी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. निवडीबद्दल पंडित यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.