*कोकण Express*
*…तर सामान्यांना रेल्वेचा प्रवास करणे होईल कठीण…!*
*खासगीकरण टाळण्यासाठी ‘एनआरएमयु’च्या पाठीशी राहावे…!*
*वेणू नायर यांचे कळकळीचे आवाहन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण रेल्वेचे खासगीकरण व्हायचे नसेल तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पाठीशी कर्मचार्यांनी उभे राहावे. जर का रेल्वेचे खासगीकरण झाले तर अदानी-अंबानींच्या हातात रेल्वे जावून सामान्यांना रेल्वे प्रवास करणे कठीण होऊन बसेस, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी कणकवली पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कणकवलीत रेल्वे कामगारांच्या हिताचे प्रश्न नेहमीच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने प्रमुखाने मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपणच बाजी मारणार असल्याचा दावा नायर यांनी केला. कोकणात आल्यावर कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांची आठवण करणे गरजेचे आहे, कारण मधु दंडवते नसते तर कोकण रेल्वे झालीच नसती, असे नायर यांनी सांगितले. तत्पूर्वी नायर यांनी कणकवली रेल्वे स्टेशनवर गुरुवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी रेल्वे कर्मचार्यांशी संवाद साधला. याशिवाय रेल्वे स्टेशनवरील मतदान बुथवर जावून मतदानाचा आढावा घेतला. यावेळी कणकवली रेल्वे कामगार संघटनेचे सचिन सरगंले, संजय करिवले, संतोष बापट, प्रशांत सावंत, संदीप संरगले, श्री. कांबळे, श्री. तांबे, श्री. खामकर, श्री. वडवळकर,श्री. गुरव, श्री. सावंत आदी कर्मचारी उपस्थित होते.
