*कोकण Express*
*कृषिचे पंचनामे करण्याचे प्रांत कार्यालयाला आदेश*
*वेंगुर्ले येथे सहकार मंत्री पाटील यांची माहिती*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
तौक्ते वादळ हे फार भयानक वादळ आलं आणि याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीची पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे झाले नाहीत त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाला देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सिधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री बाळासाहेब पाटील यांनी वेंगुर्ल्यात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान दिली. तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आज सहकार मंत्री श्री. पाटील यांनी वेंगुर्ला तालुक्यात चिपी ते वेंगुर्ला-उभादांडा-मूठ या भागात भेट दिली. यात नुकसान झालेला नवाबाग बंधारा ते प्लॅटफॉर्म व नवाबाग जेटी, उभादांडा-मूठ येथील बंधारा व बंधा-याच्या वाहून गेलेल्या जेटी तसेच जाळ्यांचे व झाडांचे नुकसानीची पहाणी केली. पहाणीनंतर माहिती देताना सहकार मंत्री पाटील म्हणाले की, या वादळाने घरांचे, झाडांचे तसेच मच्छिमार बांधवांच्या बोटीचे आणि जाळ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे झाले नाहीत त्याठिकाणी ते करण्यासाठी आदेश दिले जातील असे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डान्टस, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, प्रांतिक सदस्य एम.के.गावडे, महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,अॅन्थोनी डिसोजा, जिल्हा सदस्य भास्कर परब, नितीन कुबल, संदिप भोगटे, मकरंद परब, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी उपाध्यक्ष बावतीस डिसोजा, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन नुकसानी मिळावी अशी मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली.