*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट महाविद्यालयात “व्यक्तिमत्व विकास व शेअर मार्केट” विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*
*फोंडाघाट : गणेश इस्वलकर*
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत “व्यक्तिमत्व विकास व शेअर मार्केट” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह आर्थिक साक्षरता वाढवणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
प्रमुख वक्ते श्री. नारायण सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व विशद करताना आत्मविश्वास, प्रभावी संवाद कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त व निर्णयक्षमता या घटकांवर भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःची ताकद ओळखून सातत्याने कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी शेअर मार्केटविषयी मार्गदर्शन करताना शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना, गुंतवणुकीचे विविध प्रकार, जोखीम व संधी, तसेच दीर्घकालीन व शिस्तबद्ध गुंतवणुकीचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले. शेअर मार्केटकडे केवळ झटपट नफा मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता ज्ञान, अभ्यास व संयम आवश्यक असलेले आर्थिक क्षेत्र म्हणून पाहावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्व विकासाशिवाय यश शक्य नसल्याचे अधोरेखित केले. आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असून शेअर मार्केटसारख्या क्षेत्रातील संधी ओळखून योग्य नियोजन, अभ्यास व नैतिकतेच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी शेअर मार्केट, गुंतवणूक आणि करिअरविषयक विविध प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांना श्री. सावंत यांनी सविस्तर व समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. वाय. डाफळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. रूपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

