*कोंकण एक्सप्रेस*
*आपला अजेंडा विकासाचा ,आम्हाला याठिकाणी परिवर्तन घडवायच*
*शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून द्याल तर विकासाला पैसे कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्ला येथील प्रचारसभेत दिली ग्वाही*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
गेले दहा दिवस राज्यांमध्ये प्रचारदौ-यामध्ये फिरतोय. सर्वत्र लाडक्या बहिणींचे संख्या लक्षणीय आहे. यावरून चित्र स्पष्ट होतय की, जो निकाल विधानपरिषदेसाठी दिला तोच निकाल याही निवडणुकीत देण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे. आपला अजेंडा विकासाचा आहे. माझ्याकडे आलेला प्रस्ताव मान्य करणे एवढंच मला समजत. तो कोणी आणला, तिथे कोणाची सत्ता आहे हे पहात नाही. आम्हाला याठिकाणी परिवर्तन घडवायच आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून द्याल, त्यावेळी या भागामध्ये विकासाला पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्ला येथील प्रचारसभेत दिली.
वेंगुर्ला येथील बॅ.नाथ पै स्मारक प्रांगणात शिवसेनेची प्रचार संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे, निरीक्षक राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला तालुकाप्रमुख शितल साळगांवकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबई, ठाणे शिवसेनेचे शरिर असले तरी कोकण हे शिवसेनेचे ह्मदय आहे. या कोकणाने शिवसेनेला ऑक्सिनचा पुरवठा केलेला आहे. कोकणाचा कायापालट करण्याचा शब्द मी द्यायला. कोकणचा विकास, वेंगुल्र्याचा विकास करायचा शब्द द्यायला मी आलोय. ही बॅ.नाथ पैंची भूमी आहे. कोकणाने अनेक भारतरत्न, अनेक महानव्यक्ती दिले. कोकणाला इतिहास आहे. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असल्या हे मला माहित नाही पण वेंगुल्र्याच्या विकासाची मास्टरकी तुमच्या हातामध्ये आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून वेंगुल्र्याच्या विकासाचा फैसला तुम्हाला करायचा आहे. राज्याचा विकास करत असताना लाडकी बहिण योजनेला अनेकांनी विरोध केला. पण सगळे अडथळे पार करून ती योजना सुरू केली. कोणीही आला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. हा माझा शब्द आहे. सत्ता येते जाते नाव जाता कामा नये हे बाळासाहेब सांगायचे. मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री आहे. अनेक मंत्रीपद आहेत. पण मला या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सर्वात मोठी आहे. या योजनेतून माझ्या लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर उभं करून त्यांना लखपती झालेले बघायचं आहे. आजपर्यंत आपल्या नावासमोर वडिलांचे नाव होते. पण त्यासोबतच आपल्या आईचेही नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडविण्यासाठी कल्याणकारी योजना केल्या. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. पण या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला म्हणून मी स्वत:ला मानतो.
काही काँग्रेसवाले बोलून गेले की आरोग्याच्या सुविधा देणार. आधी तुमचं आरोग्य तरी जपा. मग आमचं आरोग्य बघा. मला पत्रकार विचारतात महाविकास आघाडीची माणसं कुठे आहेत. म्हटलं माणसं कुठे आहेत. त्यांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय. म्हणून कामाच्या जोरावर बोलतोय आणि या कामाची पोचपावती तुम्ही विधानसभेत दिली तशीच अपेक्षा या वेंगुल्र्यामध्ये आहे.
विकास कामे करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कधीच कोणाला नाराज केले नाही. त्यांनी नाराज केले नाही म्हणून वेंगुल्र्याच्या विकासासाठी 133 कोटी रूपयांचा निधी दिला. जो नेता मंत्रालयात बसतो अशा नेत्याने वेंगुर्लावासीयांची काळजी घेतली याचे परिवर्तन मतांमध्ये झालं पाहिजे असे सांगत सख्या भावापेक्षा लाडक्या भाऊ भेटायला येतोय याबाबत महिलावर्गाने जी सहनशिलता दाखविली त्याबाबत उदय सामंत यांनी महिलांचे आभार मानले.

