*कोंकण एक्सप्रेस*
*श्री रवळनाथ कलश मिरवणूक उत्साहात*
वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
स्त्री-पुरुषांची पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर, तरंगदेवतांच्या उपस्थितीत भव्य रथातून श्री रवळनाथाच्या कलशाची मोठ्या भक्तिमय वातावरणात वेंगुर्ला शहरात मिरवणूक काढण्यात आली.
वेंगुर्ला येथील श्री देव रवळनाथ आणि परिवार देवता आर्चाशुद्धी, संप्रोक्षण, कलशारोहण व महारूद्र सोहळ्याला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त रविवारी सायंकाळी कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बॅ.खर्डेकर महाविद्यालयापासून या कलश मिरवणूकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक श्री सातेरी मंदिर येथे आल्यावर देवीला श्रीफळ ठेऊन तरंगदेवतांसहीत पुढे ही मिरवणूक मार्गस्थ झाली. मार्गात श्री रवळनाथ पालखीचेही या मिरवणूकीत आगमन झाल्यानंतर श्री रामेश्वर मंदिर मार्गे श्री रवळनाथ मंदिरात या मिरवणूकीची सांगता झाली. या मिरवणूकीत बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हा कलश रवळनाथ मंदिरावर स्थापन करण्यात येणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.