*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत रेल्वे अभियंत्याची ऑनलाईन फसवणूक : दीड लाखाचा गंडा*
*कणकवली : प्रतिनिधी*
कॅनरा बँकेतील आपले अकाउंट अपडेट करायचे आहे,असे सांगून कणकवलीतील रेल्वे अभियंत्याला अनोळखी व्यक्तीने दीड लाखाचा गंडा घातला.हा प्रकार ४ जानेवारीला घडला असून त्याबाबतची फिर्याद रेल्वे अभियंता आकाश पांडुरंग गुजरी (वय ५३, रा. कणकवली) यांनी कणकवली पोलिसांत दिली आहे.
प्रकाश गुजरी हे कणकवली रेल्वे स्थानकात सेक्शन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.त्यांना ४ जानेवारीला दोन मोबाईल क्रमांकावरून एका व्यक्तीने फोन केला.त्या व्यक्तीने आपण कॅनरा बँकेतून बोलत आहोत.तुमचे या बँकेतील अकाउंट अपडेट करायचे आहे,त्यासाठी पॅनकार्ड,आधार कार्ड आणि सोबत मोबाईलवर पाठवलेला फॉर्म भरून पाठवा, असे सांगितले. त्यानुसार श्री. गुजरी यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपले आधार आणि पॅनकार्ड तपशील तसेच सोबत दिलेला फॉर्म भरून पाठवला. त्यानंतर काही वेळाने श्री. गुजरी यांच्या पणजी येथील कॅनरा बँक खात्यातील १ लाख ४९ हजार ५६८ रुपये अनोळखीने काढून घेतले असल्याची बाब श्री. गुजरी यांच्या लक्षात आली. बँक अकाउंट अपडेटच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केली असल्याची बाब लक्षात येताच श्री. गुजरी यांनी याबाबतची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दिली. कणकवली पोलिसांनी त्यानुसार अनोळखीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.