*कोंकण एक्स्प्रेस*
*योग्य प्रयत्न माणसाला अचूक ध्येय्यापर्यंत नेतात : दीक्षांत देशपांडे*
*तळेरेच्या वामनराव महाडिक विद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळा संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
‘प्रयत्न ही मानवाची यशाची पायरी आहे. यशाच्या उंचच उंच शिखरांवर पोहोचायचे असेल तर प्रयत्नांच्या पायऱ्या यथोचित सरावाने सातत्याने चढणे अतिशय महत्त्वाचे आहे’ असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील वार्षिक गुण गौरव समारंभात केले.सदर समारंभात प्रशालेचे संगीत शिक्षक अजित गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत, संस्थागीत सुमधुर आवाजात गाऊन सादर केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज तसेच वामनराव महाडिक (अप्पा) यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मुंबईचे कर सल्लागार संतोष परशुराम तळेकर, समारंभौ अध्यक्ष म्हणून भा.ज.पा.पिंपरी चिंचवड शहराचे जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे, चित्रपट-लेखक-निर्माता- दिग्दर्शक दीपक कदम प्रमुख अतिथी म्हणून लाभले. पुणे येथील उद्योगपती संतोष सुतार, माजी सभापती दिलीपभाई तळेकर,उद्योगपती नामदेव बांदिवडेकर,शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, प्रविण वरूणकर, उमेश कदम, संतोष तळेकर, संतोष जठार निलेश सोरप, प्राचार्य अविनाश मांजरेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, तळेरेे व्यापारी संघटना अध्यक्ष दशरथ कल्याणकर, तळेरे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, औदुंबरनगर पोलीस पाटील श्रेया जंगले इत्यादी मान्यवर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक,हितचिंतक उपस्थित होते.
प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला प्रेरणा देणारा प्रतीकात्मक नंदादीप तयार केला गेला, याचेही प्रज्वलन व प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. प्रशालेच्या शैक्षणिक उपक्रमांवर प्रकाश टाकणाऱ्या अहवालाचे वाचन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका धनलक्ष्मी तळेकर यांनी केले. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे,आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहोत,असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष संतोष तळेकर यांनी केले.आई-वडिलांचा आदर करा, स्पर्धा परीक्षांमध्ये सराव करून उत्तुंग असे यश मिळवा, जगाचा अनुभव घ्या,असे प्रतिपादन चित्रपट-लेखक दीपक कदम यांनी केले. अभ्यास करीत रहा. आर्थिक अडचण आल्यास आम्ही त्यावर मात करायला तयार आहोत,असे प्रतिपादन अजय पाताडे यांनी कार्यक्रमादरम्यान केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कला-क्रीडा-ज्ञान या सर्वच क्षेत्रात यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा दिवस म्हणजे बक्षिस वितरण. तळेरे ग्रामस्थांच्या दातृत्व भावनेतून आणि आप्पांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वास्तूमध्ये ग्रामीण भागातील मुले शिक्षण क्षेत्रात प्रगती करत आहेत, प्रशालेतील प्रत्येक घटक हा शाळा ही माझी जबाबदारी आहे या भावनेने प्रयत्न करत आहे,असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी अगदी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षका सुचिता सुर्वे,प्राध्यापक सचिन शेटये यांनी केले व आभार शा.स.सदस्य प्रविण वरूणकर यांनी मानले.
नुकतेच जोगेश्वरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत एकूण ४० एकांकिकांपैकी प्रथम तीन मध्ये येण्याचा मान प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला, यामध्ये विशेष लक्षवेधी अभिनय नैपुण्य पदक शमिका ढेकणे मयुरेश जठार यांना प्राप्त झाले.प्रशालेचे सहा.शिक्षक अजित गोसावी यांना संगीत क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला,५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृती मधून माध्यमिक गटातून प्रशालेच्या प्राध्यापिका नूतन भावे यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल व उपक्रमशील शिक्षिका म्हणून प्रशालेमार्फत सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.तसेच सर्वांचा प्रशालेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.