*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त शिक्षकांच्या अनेक प्रकारच्या देय रकमा दीर्घकाळ प्रलंबित*
*सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय लाभांपासून वंचित*
*कणकवली : प्रतिनिधी*
जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या त्यांना शासन व प्रशासनाकडून देय असणाऱ्या लाभाच्या रकमा निवृत्तीनंतर दीर्घकाळ उलटला तरी त्या रकमा वेळीच मिळत नाहीत.एकीकडे शासन निवृत्तांना त्यांच्या देय रकमा तात्काळ देण्यासाठी प्रयत्न करते.तर प्रशासनाकडून त्या रकमा अदा करण्यासाठी दीर्घकाळ घालविला जातो.त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय लाभांपासून वंचित राहतात.
या जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या अनेक प्रकारच्या रकमा दीर्घकाळ प्रलंबित आहेत.त्यामध्ये उपदान, अंशराशीकरण,भनिनि,गटविमा,सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते तसेच अन्य कार्यरत कालावधीतील अनेक प्रकारच्या रकमा अद्यापही मिळालेल्या नाहीत.
असे जे-जे शिक्षक पूर्वी अथवा नव्याने सेवानिवृत्त झाले असतील त्या-त्या शिक्षकांसाठी शुक्रवार दि. ०३/०१/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गनगरी (ओरोस) या ठिकाणी सकाळी. ठिक १०.०० वा. मार्गदर्शन आयोजित केलेले आहे. त्या ठिकाणी जिल्ह्यातील अशा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित राहावयाचे आहे.
सदर सभेसाठी येताना प्रत्येकाने आपल्या सेवानिवृत्ती ०४ पानी आदेशाची सुस्पष्ट छायांकित प्रत, निवृत्ती वेतन जुने व नवे पासबुक तसेच आपल्या सेवानिवृत्ती व प्रलंबित आर्थिक लाभासंदर्भात जे-जे कागदपत्र उपलब्ध असतील ते घेऊन उपस्थित राहावयाचे आहे. आपल्या कागदपत्रांची आपण योग्य ती काळजी घ्यावयाची आहे. सर्वांनी नियोजित वेळेत उपस्थित राहिल्यास मार्गदर्शन वेळीच सुरु करणे व त्यापुढील प्रत्यक्ष करावयाच्या कार्यवाहीची सुरुवात वेळीच करता येणे सोयीस्कर ठरेल.त्यासाठी कोणीही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या सभेला जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, विजय मयेकर व अन्य शिक्षक प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या संधीचा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन रमेश आर्डेकर, बाबू परब व सोनू नाईक यांनी केले आहे.