समान न्याय देणारे शिवाजी महाराज रयतेचे खरे राजे

समान न्याय देणारे शिवाजी महाराज रयतेचे खरे राजे

*कोकण Express*

*समान न्याय देणारे शिवाजी महाराज रयतेचे खरे राजे*

*रयतेचा शिवाजी’ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन*

*पियाळी शिवमहोत्सवाला सभापती रावराणे, संजय आंग्रे, मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

सर्व जाती धर्मातील मावळ्यांना समान न्याय देणारे शिवाजी महाराज हे रयतेचे खरे राजे होते. धर्मापेक्षा देश मोठा अशा कृतीतून स्व-धर्माची चिकित्सा करणारे महाराज होते. त्यांनी स्वतःच्या आईला सती प्रथेपासून रोखुन एकूण स्त्री वर्गालाच पुढील आयुष्य जगण्याला प्रेरणा दिली असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी पियाळी येथे शिवमहोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘रयतेचा शिवाजी’ या व्याख्यानात केले.
पियाळी शिवमहोत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवमहोत्सव आयोजित केला. या वेळी सदर व्याख्यानात बोलताना श्री कांडर यांनी रयतेला वाटे आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराजांचा जीव धोक्यात येता नये. रयत आणि राजा यांच्यातील असे प्रेम आजवर कधीच पाहता आले नाही. असेही आग्रहाने सांगितले. यावेळी सभापती मनोज रावराणे, जि. प. सदस्य संजय आंग्रे, समाज साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर मातोंडकर, सरपंच पवित्रा गुरव कार्यक्रमाचे संयोजक गौतम तांबे शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष रितेश तांबे, सचिव प्रतीक्षा सुतार आदी उपस्थित होते.
राजेशाही आणि सरमजामशाही राबवली जात असतानाच्या काळातच शिवाजी राजे असे होते की आपल्या राजेशाहीत लोकशाहीच कशी नांदेल याचा विचार त्यांनी केला आणि त्यानुसार आपले राज्य केले. कारण त्यांची रयतेशी बांधिलकी होती. रयतेसाठीच जगायचे आणि रयतेसाठी प्राण द्यायचा म्हणजे स्वराज्य मिळवायचे असा विचार महाराजांचा होता. म्हणूनच महाराजांसाठी प्राण द्यायला अनेकजण तयार होते. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांना शत्रूचा वेढा पडला त्यावेळी शत्रूच्या वेढ्यात अडकलेल्या महाराजांना सोडविण्यासाठी शिवा न्हावी एक सच्चा मावळा खोटा शिवाजी बनला आणि महाराजांना त्याच्यामुळेच विशाळगडावर सुरक्षित पोहोचता आलं. शिवाजी महाराजांना शत्रूच्या वेढ्यातून सोडवताना त्याला प्राण गमवावे लागले. महाराजांनी वतनदारी आणि जमिनदारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. वतनदारांची फार मिरासदारी चालायची पण महाराजांनी रयतेच्या शेतसाऱ्यासाठी अधिकारी नेमले आणि रयतेला काडीचाही त्रास न देता शेतकऱ्याकडील शेतसारा वसूल करण्याचा आदेश त्यांनी दिला. शेतीसाठी सैनिकाला सुट्टी देणारा हा एकमेव राजा. शिवाजी महाराज कायम स्त्रीच्या बाजूने होते. त्यांनी कधीही स्त्रीची बदनामी खपवून घेतली नाही. उलट स्त्रीयांच्या समस्या समजून घेऊन त्याने त्यांना आधार दिला. महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान होते. शिवाजी महाराज हिंदू होते आणि हिंदू राजाच्या बाजूने मुसलमान सिद्दी हिलाल हा आपल्या पुत्रास मुस्लिम जुलमाच्या विरोधात लढला. त्यामुळे महाराजांचा मुस्लिम द्वेष कधीच नव्हता. आजचे राज्यकर्ते मात्र जाती-धर्माविरोधात रान पेटवून सत्तेवर येतात. समाजात द्वेष पसरवतात आणि आपण मेंढरासारखे त्यांच्या मागून धावत असतो. हे आता बदलले पाहिजे.
यावेळी सभापती रावराणे, श्री आंग्रे, श्री मातोंडकर यांनीही शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!