ग्रामसेवकांमुळे गाव विकासाला चालना

ग्रामसेवकांमुळे गाव विकासाला चालना

*कोकण Express*

*ग्रामसेवकांमुळे गाव विकासाला चालना*

*राजेंद्र पराडकर यांचे ग्रामसेवक मेळाव्यात प्रतिपादन*

*सभापती रावराणे, कवी अजय कांडर, गटविकास अधिकारी चव्हाण यांची उपस्थिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गाव विकासातील ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे.ग्रामसेवकांमुळे गाव विकासाला चालना मिळते.वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यवस्था यांच्या दबावाखाली बराच वेळा ग्रामसेवकांना काम करावे लागते. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक उत्तम काम करत असून आपले प्रश्न सोडून घेण्यासाठीही ग्रामसेवक संघटना जागरूक असते.याबद्दल ग्रामसेवकांचे कौतुकच करायला पाहिजे असे प्रतिपादन जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी कणकवली पिसेकामते येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसेवक स्नेहमेळाव्यात केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (136) कणकवली शाखेचा मेळावा सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पराडकर, ग्रा. पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, नामवंत कवी अजय कांडर,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सुनील पांगम, रविकांत मेस्त्री, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संतोष गावडे, उपाध्यक्ष संदीप गवस यांच्या प्रमुख उपस्थिती पिसेकमते मैत्री पार्क येथे आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना पराडकर यांनी ग्रामसेवकांशी माझे स्नेहाचे संबंध असून अपवाद वगळता ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची वेळ कधी आपल्यावर आली नाही. कधी मिटिंग पुरतेच अधिकाराने बोलणे होत असले तरी जिल्ह्यातील ग्रामसेवकांची माझे सौहार्द पूर्णच संबंध राहिले असेही आग्रहाने सांगितले.
सभापती रावराणे म्हणाले, सरपंच आणि ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीतील महत्वाचे घटक असले तरी सरपंच हे बऱ्याच वेळा अनुभव नसणारे सरपंचपदावर विराजमान झालेले असतात. त्यामुळे ग्रामसेवक जबाबदारीने ग्रामपंचायतीची कामे करत असतात. तरीही त्यांना साध्या ग्रामस्थांना पासून तर आपल्या वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी या सगळ्यांशी तोंड द्यावे लागते. अशावेळी त्यांच्या घरातल्या कुटुंबाने त्यांना समजून घेणे गरजेचे असते. आज या स्नेहमेळाव्या त्यानिमित्ताने सर्व ग्रामसेवक आणि त्यांचं कुटुंब एकत्र आले. त्यामुळे त्यांच्यातला स्नेहभाव वाढीस लागणार आहे. आणि यामुळेच ग्रामसेवकांना अनेक ताणांना सामोरे जाऊनही विकासाची कामे करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कदाचित हा असा पहिला प्रयत्न आहे की ग्रामसेवकांनी आपला स्नेहमेळावा आयोजित केला आहे. हा आदर्श जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन आपला स्नेहमेळावा भविष्यात आयोजित करावा. मात्र स्नेहमेळावा आयोजित केल्यावर वेळेवर येऊन तो सुरू करण्यात यावा. त्यामुळे स्नेहमेळाव्यातील सगळे कार्यक्रम वेळेत होऊन त्यांचा आस्वाद प्रत्येकाला घेता येईल.मी देवगडला अनेक वर्ष कार्यरत होतो आता कणकवलीला माझ्याकडे गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार आहे. त्यातून मुक्त होऊन कायमस्वरूपी इथलाच कार्यभार मला मिळावा अशी इच्छा आहे. त्याचं कारण या तालुक्यातील ग्रामसेवक चांगलं काम करत आहेत. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
कवी कांडर म्हणाले, प्रशासन व्यवस्थेतील सगळीच माणसं वाईट नसतात.त्याचा प्रत्येय अनेक ग्रामसेवकांनी चांगलं काम करुन दिला आहे. याबद्दल ग्रामसेवकांचे कौतुक करावाव तेवढे थोडे.हा स्नेहमेळाव्यामुळे ग्रामसेवक सारख्या रुक्ष कामातून बाहेर पडून आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी ग्रामसेवकांना मिळते आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या कुटुंबातील सदस्यही आपले कलागुण सादर करतात.यामुळे असे मेळावे दरवर्षी आयोजित केले गेले पाहिजेत.आज या कार्यक्रमात नृत्य, नाटक, गाणी, विनोद असे अनेक कलागुण ग्रामसेवक आणि त्यांच्या परिवाराने सादर केल्यामुळे ग्रामसेवकांमध्येही चांगली गुणवाण कलाकार आहेत याचा शोध लागला. हीच या मेळाव्याची महत्त्वाची फलश्रुती आहे.
यावेळी श्री वारंग, श्री गावडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ग्रामसेवकांच्या पाल्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्याचबरोबर लहान मुलांसाठी प्रश्नमंजुषा, महिलांसाठी पाककला स्पर्धा, महिलांचा डान्स, मुलांचे डान्स सादर करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वाधिक आकर्षणाचा कार्यक्रम ठरला तो ग्रामसेवकांनी सादर केलेले स्वयंवर नाटक. त्याचबरोबर कराओके फेम चटकर यांनी सदाबहार हिंदी, मराठी गाणी सादर केली. सूत्रसंचालन दिपक तेंडूलकर यांनी केले, प्रशांत वर्दम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र सावंत, मंगेश राणे यांनी केले. बहुसंख्येने ग्रामसेवक आणि त्यांचा परिवार कार्यक्रमाला उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!