*कोकण Express*
*कायद्याचा आदरच, पण सिंधुदुर्गात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्यास सहन करणार नाही – कुडाळ भाजपा तालुका संयोजक विनायक राणे यांचा इशारा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
पोलिस प्रशासने निःपक्षपाती भूमिका घ्यावी आकसाने कारवाई केल्यास विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा विनायक राणे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सत्तेच्या जीवावर शिवसेना करू पाहत आहे. खासदार नारायणराव राणेंवर अश्लाघ्य टीका करून शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी राजकारणातील एकदम खालची पातळी गाठलेली आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका मान्य नसलेल्या शिवसेनेच्या राजकारणात त्यांनी जशास तशा उत्तराची अपेक्षा ठेवावी.
जिल्ह्यात, भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे यांचा पुतळा जाळणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी त्यावेळीच कठोर कारवाई करण्याची गरज होती. पण सत्तेच्या दबावाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा झुकलेली दिसते. भाजपच्या नेत्यांचे पुतळे जाळणाऱ्या शिवसैनिकांकडे डोळेझाक करून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागे कायदाचा ससेमिरा लावून दिला जात असेल तर ते सहन करणार नाही. सर्वाना एकाच न्यायाने पोलिसांनी आपली भूमिका निःपक्षपाती पणे बजवावी. कायद्याचा आम्हाला नेहमीच आदर होता व राहील, पण एकतर्फी कारवाई होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा कुडाळ भाजपाचे तालुका संयोजक श्री.विनायक राणे यांनी दिला आहे