*कोंकण Express*
*नाधवडे येथील चित्रकार सचिन मेस्त्री यांनी साकारला तांदळाच्या दाण्यावर विठ्ठल : आवडीतून जपली चित्रकला*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे महादेववाडी येथील सचिन मेस्त्री या हरहुन्नरी चतुरस्त्र चित्रकाराने चक्क तांदळाच्या दाण्यावर विठ्ठलाचे सावळे रूप साकारले आहे. अतिसूक्ष्म या विठ्ठलासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. आपल्यातील चित्रकार जपताना सचिन यांनी सामाजिकता तेवढ्याच ताकदीने पेलली आहे.
बुधवारी आषाढी एकादशी आहे, यानिमित्त त्यांनी हे सूक्ष्म विठ्ठलाचे रूप साकारले आहे. याबाबत माहिती देताना सचिन मेस्त्री म्हणाले की, आमच्या घरी गणपती शाळा आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच कलेची आवड होती. त्याला जोड देत कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता चित्रकला जोपासली. आमच्या गावातील पुरातन महादेव मंदिर, नाधवडे माध्यमिक विद्यालय यांसह अनेक चित्रे साकारली आहेत.
सचिन मेस्त्री यांनी अनेक नामवंत कलाकारांचे पेंटिंग करून त्यांना भेट दिली आहे. त्यामध्ये प्रसाद खांडेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, अभिजित चव्हाण यांचा समावेश असून या सर्वांनी मेस्त्री यांच्या कलेचे कौतुक केले आहे.
यावेळी तांदळावर काढलेल्या चित्राबद्दल म्हणाले की, 4 मिमी एवढ्या छोट्याशा तांदळाच्या दाण्यावर विठ्ठलाचे हे रूप साकारले आहे. त्यासाठी दोन तास लागले असून काळा आणि पिवळा अशा दोन पोस्टर कलरचा वापर केलेला आहे.
नाधवडे सारख्या ग्रामीण भागातही असे कलाकार आहेत, हे कोकणचे वैशिष्ट्य आहे. सचिन मेस्त्री यांच्या या आवड, छद, कष्ट व कलेबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. अशा गुणवंत कलाकाराला संधी मिळाल्यास कलेला दाद मिळेल आणि सचिनचे करिअरही घडू शकेल.