*कोकण Express*
*पटवर्धन चौकात बांधण्यात आलेले गटार अखेर ठेकेदाराने बुजविले*
नागरिकांतून समाधान व्यक्त होतंय
*कणकवली ः प्रतिनिधी*
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील पटवर्धन चौकात बांधण्यात आलेले गटार अखेर ठेकेदाराने बुजविले. चुकीच्या पद्धतीने गटाराचे बांधकाम होत असल्याने त्याला कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी हरकत घेतली होती. त्यानंतर आज हायवे ठेकेदाराने बांधलेले गटार तोडून ते बुजविण्यात आले. यामुळे नागरिकांतूनही समाधान व्यक्त झाले.
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी चुकीच्या पद्धतीने हे काम होत असल्याचा आक्षेप घेत आठ दिवसापूर्वी काम बंद पाडले होते. या गटारामुळे कणकवली शहरातील मुख्य चौकातील रस्ता अरूंद होणार होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास भेडसावणार होता. हायवे हद्द निश्चितीपासून तीन मीटर जागा सोडून हे गटाराचे काम करण्यात येत होते. मात्र नलावडे यांनी अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने शहरात काम करू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदार कंपनीच्या चूक उशिरा लक्षात आल्याने ठेकेदार कंपनीने स्वतः काँक्रिटीकरण झालेले गटार तोडून ते पूर्णपणे बुजविले. जर वेळीच आक्षेप घेतला गेला नसता तर हे गटाराचे काम पूर्ण करून ठेकेदार कंपनी काम उरकण्याच्या बेतात होती. मात्र तो डाव नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षानी हाणून पाडल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.