*कोकण Express*
*पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिल्याच्या रागातून मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आर्थिक व्यवहारात ठरलेली रक्कम न दिल्याने वैभववाडी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिल्याच्या रागातून फिर्यादी अश्विनी संतोष शिंदे यांच्या घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी आरोपी लक्ष्मण केशव शेळके व शांती लक्ष्मण शेळके रा. नावळे ता. वैभववाडी यांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी टी. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी अश्विनी शिंदे यांची सासू गुलाबी यांनी दोन वर्षापुर्वी आरोपी लक्ष्मण शेळके यांना तीच्या हिश्याची जंगली झाडे तोडण्याबाबत करार केला होता. त्यानुसार ३० हजार रुपये द्यावयाचे होते. त्यापैकी १५ हजार आरोपीने दिले होते. उर्वरीत रक्कम मागणी करूनही देत नसल्याने ७ जानेवारी २०१७ रोजी गुलाबी शिंदे यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला. याची माहिती मिळताच त्याच दिवशी रात्री ८.३० वा. लक्ष्मण शेळके व त्याची पत्नी शांती हे मोटारसायकलने फिर्यादीच्या घरी गेले. त्यांनी दरवाजा तोडून घरात अनाधिकारी प्रवेश करून फिर्यादी अश्विनी व तीचा नवर संतोष यांना मारहाण केली तसेच ठार मागण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या. याबाबत वैभववाडी पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध भादंवी कलम ४५२, ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती व अन्य त्रुटींमुळे दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.