*कोकण Express*
*कपाटातील गुदमरलेल्या पुस्तकांना श्वास देणे आवश्यक ; डॉ. सतीश कामत*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे ग्रंथालय दिन संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्त्व कळावे, मोबाईलमध्ये पूर्णपणे अडकलेली तरुण पिढी थोडी तरी पुस्तकात यावी याच हेतूने हा उपक्रम ग्रंथालय विभागामार्फत घेण्यात आला. ग्रंथालयाचे जनक श्री. रंगनाथन यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा दिवस जगभर साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथपाल डॉ. विद्या मोदी यांनी या दिनाचे महत्त्व सांगितले. आपल्या वक्तव्यात त्या म्हणाल्या की ग्रंथालयाचे जनक श्रीरंगनाथन हे होते. परंतु त्यापूर्वी ग्रंथालय नव्हती असे नाही. त्यावेळी ग्रंथालये ही बंदिस्त होती. राजा महाराजां पूर्ती मर्यादित होती. शिक्षित समाजच कमी होता. त्यामुळे पुस्तके ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती. प्रतिष्ठितांची जहागीरी पुस्तकांवर होती. श्री रंगनाथन यांनी ही ग्रंथालय सार्वजनिक केली. कोणतीही पुस्तके सर्व समावेशक पद्धतीने समाजाच्या हाती लागली पाहिजेत याची काळजी घेतली. याचाच परिणाम म्हणून आज ग्रंथालय चळवळ उभी राहिली. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय सुद्धा विविध पुस्तकांनी समृद्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी वाचता झाला तर तो लिहिता होईल आणि लिहीता विद्यार्थी सज्ञान होईल.
आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्रंथालयातील सहभाग चांगला आहे. तो आणखीन वाढणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की मोबाईलच्या जगात पुस्तके गुदमरायला लागली आहेत. सर्वच पुस्तके मोबाईलमध्ये सापडतात. त्यामुळे मोबाईल हा सर्वव्यापी झाला आणि त्यामुळेच माणूस व्यापला आहे. अर्थात मोबाईल मधील वाचन हे चांगले वाचन होऊ शकत नाही. पुस्तकांच्या पानांचा आनंद त्यात निश्चित नसतो. हल्ली पुस्तके कपाटात गुदमरायला लागली की काय? असे वाटायला लागले. या गुदमरणाऱ्या पुस्तकांचा श्वास मोकळा करण्याची गरज आहे. आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी ग्रंथालयात जातो ही समाधानाची बाब आहे. परंतु जे अजिबातच जात नाहीत त्यांनाही ग्रंथालयाची गोडी लावणे आवश्यक आहे. वाचनीय पिढीच समाज परिवर्तन करू शकते. हाच इतिहास आहे. असे प्रतिपादन केले.
यानिमित्ताने दयेश मेजरी या विद्यार्थ्यांने रंगनाथन यांच्या संपूर्ण कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी पाटकर हिने केले तर आभार शुभम लाड यांने मानले. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता.