*कोकण Express*
*वेंगुर्ल्यात आनंदयात्री वाड़्मय मंडळाचा ‘सृजनवाटा समजून घेताना’ कार्यक्रम उत्साहात*
*आनंदयात्री वाड़्मय मंडळाच्या ‘सृजनवाटा समजून घेताना’ या दीर्घकालीन उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला येथील साई दरबार हॉल येथे आनंदयात्री च्या वतीने आयोजित केलेल्या ‘सृजन वाटा समजून घेतना’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक तरुण भारत रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख संपादक शेखर सामंत आणि अभिनेते व दिग्दर्शक संजय पुनाळेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर ,राजाराम नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित राऊळ तसेच आनंदयात्रीच्या अध्यक्ष वृंदा कांबळी उपस्थित होत्या.
उद्घाटनपर पहिल्या सत्रात बोलताना तरूण भारतचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख संपादक शेखर सामंत म्हणाले की मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतो. साहित्य व पत्रकारिता ही जवळची क्षेत्रे असली तरीही साहित्य क्षेत्रापासून मी दूर असतो. पण साहित्यिकाना आम्ही पुढे आणण्यासाठी व्यासपीठ देतो.आज या साहित्यिक कार्यक्रमाला उपस्थित राहाताना मला आनंद होत आहे. कारण आज साहित्याची अभिरूची निर्माण करणे आणि वाचन संस्कृती वाढवणे ही काळाची गरज आहे. कांबळी मॅडम जिल्ह्यात हे साहित्यिक चळवळ रूजवण्याचे काम आनंदयात्री वाड़्मय मंडळाच्या माध्यमातून करत आहेत हे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. आमच्याकडून त्यांच्या या कार्याला सदैव सहकार्य राहील. यानंतर सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक सचिन वालावलकर यानी सांगितले की सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजात विविध क्षेत्रात जे लोक काही करत आहेत त्याना प्रोत्साहन देणे, त्याना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे मी मानतो. समाजातील कार्य करणाऱ्या लोकांच्या अडचणी समस्या समजून घेतल्या पाहिजेत. आनंदयात्रीच्या वाटचालीत माझ्याकडून होईल तेवढे सहकार्य सदैव राहील.अभिनेते व दिग्दर्शक संजय पुनाळेकर म्हणाले की माझे क्षेत्र हे नाट्यक्षेत्र असले तरी आनंदयात्री वाड़्मय मंडळाशी माझा जवळचा संबंध आहे. मंडळाच्या कार्यात हातभार लावायला मला आनंदच आहे. मी नेहमीच आनंदयात्रीच्या कार्यात सहभागी राहिलो आहे.एक साहित्यिक चळवळ यारूपाने वेंगुर्ल्यात रूजली आहे.
दुसऱ्या सत्रात सिंधुदुर्गातील *दिवंगत लेखक श्रीपाद काळे* यांच्या साहित्यावर कार्यक्रम झाला. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या साहित्यावर बोलताना प्राजक्ता आपटे यानी श्रीपाद काळे यांच्या *’हा माझा मार्ग एकला’* या कादंबरीवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. फाल्गुनी नार्वेकर या काॅलेज विद्यार्थिनीने *’सल’* या कथेचे कथन केले.जान्हवी कांबळी यानी *’काजळलेले दिवस’* या कादंबरीतील काही सुंदर उताऱ्याचे वाचन केले. प्रदीप केळुसकर यानी श्रीपाद काळे यांच्या एकूण साहित्यिक वाटचालीचा आढावा घेतले. सीमा मराठे यानी *’दूध आणि दुधावरची साय’* या कथेचे सुंदर अभिवाचन केले.प्रितम ओगले यानी श्रीपाद काळे यांच्या *’उमा’* कादंबरीचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. अध्यक्षपदावरून बोलताना अजित राऊळ यानी एकूण झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. सुरूवातीला वृंदा कांबळी यानी *’सृजनवाटा समजून घेताना’* या नावाचा अर्थ व उपक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस.कौलपुरे यांनी तर प्रा. सचिन परूळकर यानी आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील साहित्यप्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, गुरुदास तिरोडकर,विवेक तिरोडकर यांनी विशेष मेहनत घेतली.