ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

*कोकण Express*

*ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर*

*बावशी येथे सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

बावशी पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळतर्फे यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या पहिल्या प्रेरणा पुरस्कारासाठी तिवरे वाळवेवाडी येथील ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,शाल आणि पुष्पगुच्छ अशा स्वरूपाचा हा पुरस्कार श्री. वाळवे यांना गुरुवार २५ जानेवारी 23 रोजी मंडळाच्या गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात रात्रौ ९ वा. आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी मान्यवर व्यक्तीच्या हस्ते प्रधान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक कांडर, कार्यवाह महेंद्र मर्ये आणि उपाध्यक्ष अविनाश बावकर यांनी दिली.
बावशी गावठण पावणा देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ स्थापन करून श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात तिरंगी डबलबारीचा सामना, दशावतार नाटक, स्त्री आणि पुरुषांची विविध भजने, रेकॉर्ड डान्स आधी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या मंडळातर्फे यावर्षीपासून प्रेरणा पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले असून या पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांची निवड करण्यात आली. ही निवड बावशी गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केली असल्याची माहितीही दीपक कांडर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी दिली.
सदानंद वाळवे हे सुमारे 40 वर्ष दशावतार कलेमध्ये एक गुणी कलाकार म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्गच्या विद्यमान दशावतार कलाकारांमध्ये जी काही मोजकी नावे अग्रेसरपणे घेतली जातात यात सदानंद वाळवे यांचा अग्रक्रम लागतो. बावशी गावच्या हौशी दशावतार प्रयोगांमध्ये सदानंद वाळवी यांनी आपल्या दशावतार कलेला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक नामवंत दशावतार मंडळांच्या दशावतार खेळामध्ये प्रमुख भूमिका साकारून दशावतार रसिकांचे मनोरंजन केले. या त्यांच्या सगळ्या योगदानाची दखल घेऊन या प्रेरणा पुरस्कारासाठी सदानंद वाळवे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती दीपक कांडर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!