सिंधुदुर्गातील ‘वारकर्‍यांचे’ वारकरी भवन पंढरपुरात व्हावे – सतीश सावंत

*कोकण Express*

*सिंधुदुर्गातील ‘वारकर्‍यांचे’ वारकरी भवन पंढरपुरात व्हावे – सतीश सावंत*

*सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा कळसुलीत मेळावा…..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्गातील वारकर्‍यांचे एक स्वप्न आहे. त्यांना सुध्दा वाटते की पंढरपूरात गेल्यानंतर सिंधुदुर्गाचे वारकरी भवन झाले पाहिजे. त्याला बरीच वर्षे वारकर्‍यांचे प्रयत्न चालू आहेत, मात्र त्याला यश आलेले नाही. महाराष्ट्र शासनाकडून जागा देण्यात आलेली असतानाही वारकरी भवन झालेले नाही. सिंधुदुर्गातील वारकर्‍यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असून पंढरपूरात सिंधुदुर्गातील वारकर्‍यांचे वारकरी भवन कसे होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्याला निश्चितच विठू माऊलीकडून बळ मिळेल असा विश्वास सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्यावतीने कळसुली येथील श्री भोगनाथ मंदिरात आयोजित वारकरी मेळाव्यात सिंधुदुर्ग बँक सतीश सावंत यांनी वारकरी सांप्रदायाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. सतीश सावंत म्हणाले, वारकरी मेळाव्याच्या रुपाने आज पंढरपुरात आल्याचा आनंद मिळत आहे. वारकरी सांप्रदायकडून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जात आहे. कोरोनासारख्या संकट काळातही विठू माऊली डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक यांच्या रूपातून समाज रक्षणासाठी उभी राहिली. सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने वारकरी बांधव असून त्यांच्यासाठी पंढरपूर येथे सिंधुदुर्ग वारकरी भवन होण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

वारकरी सांप्रदायाकडून व्यसनमुक्तीचे मोठे काम होत आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे बरबाद होत असताना केवळ विठू माऊलीच्या चरणी लीन झाल्यानंतर अनेकांनी व्यसनाचा त्याग केला आहे. हीच विठू माऊलीच्या नामस्मरणाची ताकद आहे. नेहमी धकाधकीच्या जीवनात वावरत असताना टाळ-मृदुंग, अभंगाचे स्वर कानी पडल्यानंतर मनःशांती मिळत असते असे सतीश सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्यावतीने अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते सतीश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास मोठ्या संख्येने सिंधुदुर्गातील वारकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!