*कोकण Express*
*करूळ हायस्कूल येथे व्यसनमुक्त गाव अभियाना अंतर्गत व्यसनमुक्तीवर प्रबोधन*
*कणकवली ः प्रतिनीधी*
नशाबंदी मंडळ आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्तपणे नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ हायस्कूल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात व्यसनमुक्त गाव या अभियाना अंतर्गत व्यसनमुक्ती वर प्रबोधन करण्यात आले.
आपल्या गावाला व्यसनांच्या गुलामगिरीतून सोडवण्याचा प्रयत्न केला तरच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकतो, असे विचार नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या, गावात वाढत असलेल्या व्यसनांना वेळीच आवर घातला नाही तर गावाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. व्यसनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दारू, तंबाखू, गुटखा यांच्याही पुढे जाऊन अमली पदार्थांचे व्यसन आपल्या दारापर्यंत कधी येईल याचा थांगपत्ताही आपल्याला लागणार नाही. संपूर्ण समाजाला यांचा विळखा बसेल तेव्हा आपण आपले स्वातंत्र्य हरवून बसू. म्हणूनच आपण ‘आमचे कुटुंब, व्यसनमुक्त कुटुंब’ असा संकल्प करुयात.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी अशा संकल्पांची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले योगदान दिले आहे. तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता व्यसनमुक्तीच्या स्वातंत्र्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग महत्त्वाचा आहे, असं विचार व्यक्त केले. तसेच रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा श्रध्दा पाटकर यांनी आपण प्रत्येकाने आपले कुटुंब व्यसनमुक्त करण्याच्या या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन संपूर्ण गाव व्यसनमुक्त करूयात, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद मेस्त्री यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या वतीने रुचिका गोसावी, निलेश फोंडेकर, राजेंद्र सावंत, अमृता कुमठेकर तसेच रोट. सुजय जाधव, रोट. अनुराग वर्देकर, रोट. पांडुरंग पारकर यांनी प्रयत्न केले.