*कोकण Express*
*खळबळजनक आणि धक्कादायक ; सिंधुदुर्गातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केला 25 हजार रुपयांचा दारू घोटाळा*
*कुडाळ मधील सामाजिक कार्यकर्त्याने पकडून दिलेली दारू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आपापसात वाटून..*
*सिंधुदुर्ग :*
कुडाळ येथे एका सामाजिक कार्यकर्त्याने निदर्शनास आणून दिलेल्या बेवारस दारुसाठ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता कुडाळ पोलीस ठाण्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी मिळालेला 25000 रुपयांचा बेवारस दारु साठा आपापसात वाटून घेतल्याची खळबळजनक तितकीच धक्कादायक घटना गेल्या काही दिवसापूर्वी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात कुडाळ येथे दि. 12 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 6.00 वाजता येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. गुरूनाथ उर्फ नाथा मडवळ यांना तीन गोणी बेवारस स्थितीत सापडलेल्या दारु साठ्याबाबत कुडाळ पोलिस निरीक्षकांना फोन वरून माहिती दिली. त्यानंतर कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलिसांनी पोलीस गाडीने त्या दारूच्या गोण्या पोलीस स्टेशन मध्ये आणल्या. तिन्ही गोणीत मिळून सुमारे दोनशे दारूच्या बाटल्या व त्यांची अंदाजे किंमत 25000 रुपये इतकी आहे. हा सर्व दारू चा माल पोलीस उपनिरीक्षक यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे समोर हजर केला. परंतु या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास दिली नाही. तसेच त्यानंतर या दारू साठा प्रकरणात बेवारस दारू जप्तीचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. जर अनक्लेम गुन्हा दाखल केला असता, तर मिळालेला बेवारस दारु साठा नियमानुसार सरकारी मुद्देमालात कायदेशीररित्या जमा करावा लागला असता. मात्र, तसे काहीच न करता फक्त डायरी नोंद करुन 25000 रुपयांचा बेवारस दारुसाठा आपापसात वाटून घेतला.
वास्तविक बेवारस दारू सापडल्यावर त्यावर गुन्हा नोंद करणे आवश्यक असताना तसा गुन्हा त्यांनी नोंद करायला दिला नाही आणि 25000 रुपयांच्या दारूसाठ्यावर कायदेशीर गुन्हा नोंद न करता तो दारू चा माल पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपापसात वाटून घेतला.
वास्तविक हे प्रकरण धक्कादायक असून, जनतेने पकडून दिलेल्या दारूवर पोलीस अधिकारी कायदेशीर कारवाई करीत नाहीत आणि मिळालेला माल आपापसात वाटून घेतात आणि ते सुद्धा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी? जर प्रभारी अधिकारी असे वागत असतील तर जनतेने कोणावर विश्वास ठेवावा.
सामाजिक कार्यकर्ते श्री. मडवळ यांनी एक जागृत नागरिक या नात्याने तसेच मोठ्या विश्वासाने कुडाळ पोलीस स्टेशनला फोन वरून बेवारस दारूप्रकरणी माहिती दिली होती. परंतु कुडाळ पोलिस स्टेशनच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी श्री. मडवळ यांचा विश्वासघात केला. तसेच समस्त कुडाळच्या जनतेचा सुध्दा यांनी विश्वासघात केलेला आहे. जर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असे वागणे असेल तर अशा पोलीस स्टेशनच्या कामकाजावर कुडाळच्या जनतेने कसा विश्वास ठेवावा.
प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दररोज दाखल होणाऱ्या घटनेबाबत किंवा पकडलेल्या कोणत्याही मालाबाबतची माहिती दररोज सार्वजनिक जाहीर केली जाते. परंतु या प्रकरणात माहिती अधिकारात गेल्या चार महिन्यापूर्वी मागितलेली माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या दारू घोटाळ्यास पुष्टी मिळालेली आहे.
अशा अधिकाऱ्यांवर मोठ्यात मोठी कारवाई झाली नाही तर भविष्यात जिल्ह्यातील इतर अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणेच वागतील. तसेच अशा अधिकाऱ्यांना भविष्यात प्रभारी अधिकारी पदावर ठेवू नये आणि एकंदर या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात केल्यामुळे अशा अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा देऊ नये.